
– बडनेरा ते अंजनगाव बारी मार्गावरची घटना
अमरावती-बडनेरा ते अंजनगाव बारी मार्गावरच्या प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका शेतात शनिवारी सकाळी कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या विहिरीत कोसळला. त्यापाठोपाठ कुत्राही विहिरी पडला. दुपारी वनविभागाच्या रेस्क्यू टीमकडून दोघांनाही बाहेर काढण्यात आले.
उपरोक्त मार्गावर पांडुरंग अंबाडकर यांचे शेत आहे. शनिवारी सकाळी शेतात असलेल्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट आला. त्याने कुत्र्यावर झेप घेतली पण दक्ष असलेल्या कुत्र्याने बिबट्याचा वेध चुकविला. त्यामुळे बिबट लगतच्याच विहिरीत पडला. त्याच्या मागोमाग घाबरलेला कुत्राही विहिरीत कोसळला. दोघांनीही विहिरीतल्या लाकडी फाट्याचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान या घटनेची माहिती शेतमालक अंबाडकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी अनेकांना ही माहिती सांगितली. वनविभागाला सूचना देण्यात आली. काही वेळाने पथक बिबट्या व कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. शर्थीचे प्रयत्न करून दोघांनाही बाहेर काढण्यात आले. ही घटना पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.





