
बैठकीला महाज्योतीच्या अध्यक्षासह व्यवस्थापकीय संचालक गैरहजर
नागपूर,दि.18 : महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) योजनांची जहिरात करण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून चित्ररथ गावोगाव फिरवण्याची योजना अखेर गुंडाळण्यात आली आहे. महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे,अनेक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते.त्याची दखल घेत संचालक मंडळातील तीनही संचालकांनी जाहिरातीची कल्पना अव्यवहार्य ठरवून ती रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.मात्र या बैठकीला महाज्योतीचे अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणारे राज्याचे बहुजन कल्याण मंत्री आणि व्यवस्थापकीय संचालक मात्र गैरहजर होते,हे विशेष.
सामाजिक न्याय भवनातील महाज्योतीच्या कार्यालयात संचालक मंडळाची चौथी सभा घेण्यात आली. या संचालक मंडळाच्या सभेला, महाज्योतीचे अध्यक्ष व ओबीसी मंत्री उपस्थित नव्हते. तसेच व्यवस्थापकीय संचालक देखील गैरहजर होते. त्यामुळे संचालक लक्ष्मण वडले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
या बैठकीत २०२३ मध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेच्या नीट-सीईटी साठी महाज्योतीकडून मोफत प्रशिक्षण देण्यासाठी, या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. किमान कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम हे पालावरचे, भटके अशिक्षित व अल्पशिक्षित युवक व महिला यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचे महाज्योतीचे कार्यक्रम सुरू करण्यात यावे, असा निर्णयही घेण्यात आला. महाज्योतीच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेशासाठी आवश्यक स्पर्धा परीक्षेमध्ये ओबीसी व भटक्या जाती जमातीचा सहभाग अगदी नगण्य आहे. महाज्योतीच्या वतीने दहावीनंतरच दोन वर्षासाठी एनडीए स्पर्धा परीक्षेची व बारावीची तयारी करण्यासाठी विविध नामवंत संस्थांकडून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण द्यावे, असा ठराव संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी मांडला. त्याशिवाय महाज्योतीचे संचालक डॉ. बबनराव तायवडे यांनी सीए व अकाउंटन्ट या नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण महाज्योतीच्या वतीने देण्याचा विषय मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आलीपहिल्या वर्षी १०० विद्यार्थ्यांना एनडीएमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षित करायचे, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.




