
बुलडाणा— जिल्ह्यातील दुसरबीडजवळील तढेगावमध्ये मोठा अपघात झाले आहे. सिंदखेडराजा- मेहकर महामार्गावरील तढेगाव फाट्यावर हा अपघात घडला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे ट्रक तढेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उटल्याने हा अपघात घडला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 लोक ठार झाले असून 3 लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना आज दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे.
किनगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून गंभीर जखमींना जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर यातील तीन रुग्णांवर सिंदखेडाराजा येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरु आहे.

अशी घडली घटना?
सिंदखेडराजा- मेहकर महामार्गावर बसला साईड देत असतांना रस्त्याच्या बाजूला उभा केलेला ट्रक (क्र. एम.एच. 11 सीएच 3728) पावसामुळे रस्ता खचून कलंडला व अपघाताने रस्त्याच्या खाली पूर्णपणे उलटला. त्यामुळे टिप्परच्या मागच्या भागात लोखंडी बारवर बसलेले 16 जण त्याखाली दबले गेले. दरम्यान, या दुर्घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती किनगाव राजा पोलिसांनी दिेली आहे.

मृतांची ओळख अद्याप पटली नाही
या अपघातात अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावरील कामावरुन परतताना काळाने या मजुरांवर घाला घातला. यामध्ये 16 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशातील खरगोन येथून आलेले होते. परंतु, मृतांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. वाचलेल्या तिघांमध्ये एका पाचवर्षीय मुलीचा समावेश आहे.




