
गडचिरोली,दि.08-गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या “ पोलीस दादालोरा खिडकी ” च्या माध्यमातून गरजु युवक-युवतींकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गुरुवारी ब्युटीपार्लर, फोटोग्राफी व कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकरीता पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व १६७ उमेदवारांना प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दल , बीओआय आरसेटी गडचिरोली , कृषी विज्ञान केंद्र , गडचिरोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) सोनापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्वयंरोजगार मेळाव्यास कृषी विज्ञान केंद्र व बीओआय आरसेटी अंतर्गत ब्युटीपार्लर ३५ , फोटोग्राफी ३५ व कुक्कुटपालन ९७ अशा एकुण १६७ प्रशिक्षणार्थ्यांनी या मेळाव्यात आपला सहभाग नोंदवला. यावेळी ब्युटीपार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्येकी १ पार्लर चेअर व कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १७ उमेदवारांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी रोड आयस्लँड रोड जातीचे प्रत्येकी १० नग कुक्कुटपक्षी ( चिक्स ), खादय, भांडी व इतर साहित्य वितरीत करण्यात आले व फोटोग्राफीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असुन त्यापैकी मुलाखती मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मोठ्या कंपनीत नोकरीकरीता पाठविण्यात येणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक – युवतींना ब्युटी पार्लर ७०, मत्स्य पालन २५, कुक्कुटपालन २२२, शिवणकाम ३५, मधुमक्षिकापालन ३२ व शेळीपालन ६७, पालेभाज्या लागवड ११४, फोटोग्राफी ३५ अशा एकूण ६०० बेरोजगारांना प्रशिक्षण देवून स्वयंरोजगारासाठी आत्मनिर्भर केले आहे. तसेच हॉस्पीटॅलिटी, ऑटोमोबाईल प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक व नर्सिंग असिस्टंट म्हणून आज पर्यंत २११९ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे.





