जहाल नक्षली अजय हिचामी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

0
81

• शासनाने जाहीर केले होते 02 लाख रूपयांचे बक्षीस.

अशोक दुर्गम/गडचिरोली,दि.11ः पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा (जां.) हद्दीत दि. 11/10/2021 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वात गट्टा (जा.) जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोलीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली अजय हिचामी यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.
नक्षल दृष्टया अतिसंवेदनशिल मौजा झारेवाडा येथील रहीवासी असलेला अजय हिचामी वय 30 वर्षे रा. झारेवाडा पोमके गट्टा (जांबिया) ता. एटापल्ली जि. गडचिरोली हा सन- 2019 मध्ये नक्षल गट्टा दलममध्ये भरती होवुन सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या ॲक्शन टीमचा सदस्य होता.
सन 2021 मध्ये पोमके गट्टावर दोन वेळा झालेल्या पोस्ट अटॅक, पोमके बुर्गीवर झालेल्या पोस्ट अटॅक मध्ये त्याचा समावेश होता. तसेच दिनांक 18/09/2021 रोजी सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. 2019 पासुन आजतागायत त्याच्यावर एकुण 03 खुन, 05 चकमक व 01 दरोडयाचा असे एकुण 09 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर 02 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.