सावंतवाडी:-:-घरची बेताची परिस्थिती, सांगली जिल्ह्यातील पडे गाव तालुक्यातील वांगी सारख्या अती दुर्गम भागातील त्यामुळे जास्त शिकली तर मुलगी वाया जाईल अशी सामाजिक वृत्ती पण तरी देखील आई- वडील आणि भावोजी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अथक प्रयत्न करून पोलिस खात्यात अधिकारी बनलेल्या आणि सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात “लेडी सिंघम” म्हणून नाव लौकिक प्राप्त केलेल्या स्त्री शक्ती म्हणजेच सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. स्वाती अंकुश यादव – बाबर.
वडील पडेगाव येथे वायरमन म्हणून कामाला होते. आई अशिक्षित परंतु, आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी करावी. हीच इच्छा शक्ती. मुलगी प्रमाणापेक्षा जास्त शिकली तर ती चुकीच्या मार्गाला जाते. अशी समजूत त्या काळात समाजाची असताना देखील आपल्या मुलींवर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या ५ ही मुलींना शिक्षण घेऊ दिले. त्या काळात मुलींना जास्त शिक्षण देण्यास विरोध असल्याने मोठ्या ४ बहिणीची लहान वयातच लग्न झालं. आई, आत्या आणि लहान वयातच लग्न झालेल्या बहिणीचे आयुष्य त्यानी अगदी जवळून पाहिले होते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीचं स्थानच समाजाने नाकारले असल्याने अनेक कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. शाळेत – कॉलेज मध्ये जात असताना रोड रोमियोकडून छेडखानी होत असताना देखील खाली मान घालुन शाळेत – कॉलेजला जायचे, आणि पुन्हा घरी यायचे. या प्रकाराबाबत घरात सांगणे देखील कठीण होते. कारण मनात शाळा – कॉलेज बंद होण्याची भीती होती. अशातच १२ विचे शिक्षण घेत असताना वडिलांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या लग्नाच्या गोष्टींनी जोर धरला परंतु, अशा वेळी त्यांचे भावोजी शिरीष यादव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यानी त्यांच्या लग्नाला विरोध करत त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली. आणि त्यांनी देखील भावोजी शिरीष यादव यांच्या विश्वास सार्थकी ठरवला. वडिलांच्या निधनानंतर घरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात काकाकडून मारहाण करण्यात आली. यावेळी पोलीस स्थानकात गेलो असताना काकाकडून भर पोलिस ठाण्यात फौजदारीचे देण्यात आलेले चेलेंज त्यांच्या आयुष्यातील “टर्निंग पॉईंट” ठरले. त्या वयात फौजदार म्हणजे काय आणि ते होण्यासाठी काय करावे लागते याची माहिती देखील नव्हती. परंतु, त्याचे ज्ञान भावोजी शिरीष यादव यांच्याकडून मिळाले आणि त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू करत चांगले यश त्यानी मिळवले. भावोजीचा पाठिंब्यामुळेच त्यांची बहिण आणि त्या आज फौजदार या पदावर विराजमान होऊ शकल्या. आई अशिक्षित असल्याने तिला केवळ शिक्षक आणि हवालदार ही दोनच पदे माहित होती. त्यात आपल्या मुलीने शिक्षक व्हावे हीच तिची इच्छा होती. परंतु, फौजदार या क्षेत्रात अधिकारी पदावर नियुक्त झाल्यानंतर “आईने माझी मुलगी हवालदार झाली” म्हणून तिने केलेला गौरव आपल्यासाठी अभिमानास्पद होता. असे त्या आवर्जून सांगतात.
👉महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ट्रेनिंग साठी पहिल्यांदाच घर सोडून नाशिक येथे गेल्या. ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना उपनिरीक्षक म्हणून पहिली पोस्टिंग २०१६ साली बोरिवली येथे मिळाली. तर त्यानंतर २०१६ ते २०१८ पर्यंत रत्नागिरी येथे उपनिरीक्षक म्हणून काम केले. तर २०१८ पासून आजपर्यंत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पोलिस स्थानकात सेवा बजावत आहेत. या कालखंडात त्यानी दामिनी कक्ष, महिला दक्षता कक्ष यांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे संसार पुन्हा एकदा मार्गावर आणले. अनेक गुन्हात त्यानी योग्य प्रकारे तपास करत गुन्हेगारांना शिक्षा मिळवून दिली. त्यानी पोलिस खात्यात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांना पदोन्नती देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. पोलिस दलातच कार्यरत असणारे त्यांचे पती अन्नासो बाबर यांच्या खंबीर साथीमुळे आणि विश्वासामुळे त्यांना घर आणि नोकरी सांभाळताना म्हणावी तशी तारेवरची कसरत करावी लागली नाही. आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वाती यादव यांनी आपली एक वेगळी ओळख समाजात निर्माण केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यानी आज लेडी सिंघम म्हणून नाव लौकिक मिळवले आहे. त्यांच्या धडाडीच्या कार्यामुळे अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. कोरोना काळात देखील त्यांनी रस्त्यावर उतरत उत्कृष्ठ असे काम केले आहे. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने पती अन्नासो बाबर यांच्या बरोबर त्या गरजू लोकांना सढळ हस्ते मदत करतात. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतील पूरग्रस्तांना मदत केली.