गोंदिया : गोंदिया स्टेशन हे देशातील प्रमुख रेल्वे लाईन हावड़ा – मुंबई तसेच दिल्ली – चेन्नई मार्गावरील महत्वाचे स्थानक आहे. चारही दिशेला येथून शंभर च्या वर गाड्या धावतात. दररोज हजारो प्रवाशी येथून ये जा करतात. मात्र मुंबई ला जाण्यासाठी सुपर फास्ट ट्रेन गोंदिया येथून उपलब्ध नाही. सोबतच बालाघाट जिल्ह्यातील अनेक प्रवासी देखील मुंबईला जाण्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानाकालाच प्राधान्य देतात. सध्या १६ ते १७ तास प्रवास करून नागरिकांना मुंबईला पोचावे लागते. तसेच सायंकाळी कुठलीही गाडी मुंबई करीता नसल्याने नागरिकांना इतर गाड्यांमध्ये प्रवास करावा लागतो. गाडी क्रमांक १२२६१ हावड़ा – मुंबई आणि १२२६२ मुंबई – हावड़ा दुरंतो ला गोंदिया येथे थांबा दिल्यास १६ तासांचा प्रवास १३ तासांवर येईल आणि नागरिकांचा वेळ वाचेल. याचा लाभ गोंदिया सोबतच शेजारील बालाघाट जिल्ह्याला देखील होईल. म्हणून मुंबई हावडा तसेच हावडा मुंबई दुरंतो गाडी ला गोंदिया येथे थांबा देण्याबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे भेट घेत थांबा देण्याबाबत विनंती केली आहे. सदर गाडीचा थांबा गोंदिया येथे मिळाल्यास गोंदियाकराना हावडा मुंबई दुरंतो हि आठवड्यातून ४ दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार गोंदियावरून मुंबई करीता आणि मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवार मुंबईवरून गोंदिया करिता आठवड्यातून ४ दिवस उपलब्ध राहील. दरम्यान गाडीला थांबा देणेबाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करणे बाबत आश्वासन आमदार विनोद अग्रवाल यांना दिले आहे.