विविध समाजवर्ग व आदिवासी संघटनांतर्फे राजा रावण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चर्चा संगोष्ठी व पुजा कार्यक्रम संपन्न
गोंदिया:- आर्य लोकांनी नेहमी अनार्य आदिम लोकांना राक्षस, असुर,वानर म्हणून हिणवले आहे. आदिवासी लोकांच्या साध्या भोळ्या वृत्तीचा फायदा घेवुन त्यांच्या संरक्षकाला गुन्हेगार दाखवून त्यांच्याच हस्ते जाळून घेण्याची मोठे कपट कारस्थान केले आहे. आपण पान वाचण्यातच कमी पडत असल्याने खोट्या मनुवादी इतिहासकारांचे मतांचे गुलाम होवून बसले आहोत. पण आता अस चालणार नाही. मनोरंजनासाठी खोट्या कूप्रथेच्या नावा खाली महान राजा रावणाचा अपमान करून विंटबना करणे हा गुन्हा आहे. रावण दहन या कुप्रथेला प्रखर विरोध व्हायलाच हवे. जो पर्यंत रावण दहन कूप्रथा बंदी कायदा अस्तिवात येत नाही तो पर्यंत आपण लढा कायम राहिल. ऐतिहासिक माहितीच्या आधारे कायद्यान्वये प्रयत्न आपला राहणार व त्याकरिता आपली लढाई निरंतर राहील असे ठळक विचार कोयावंशी गोंड राजा रावण यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित चर्चा संगोष्ठी कार्यक्रम प्रसंगी उपस्थीत मान्यवरानी व्यक्त केले. बिरसा क्रांती दल, राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळ, संविधान मैत्री संघ व नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन च्या वतीने स्थानिक आदिवासी कॉलोनी परमात्मा एक नगर कुडवा रोड येथे आयोजित या चर्चा संगोष्ठी कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा बिरसा मुंडा व वीरांगना राणी दुर्गावती यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करुन झाली. प्रसंगी दीप प्रज्वलन करुन आदिम कालीन गोंड पद्धतीने न्यायप्रीय राजा रावणाची पुजा करण्यात आली. या कार्यक्रमाची अध्यक्षता एल टी पंधरे यानी केली तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, मातंग समाज संघ प्रमुख वसंत गवळी, घनश्याम तोडसाम, धनराज तुमडाम, ओबिसी संघर्ष कृती समितीचे कैलाश भेलावे, सुनिल भोंगाडे, प्रमुख अतिथी म्हणून बिरसा क्रांती दलाचे मालती किन्नाके, राणी दुर्गावती मंडळचे गीताताई सलाम, नेशनल आदिवासी फेडरेशनच्या प्रमिला सिंद्रामे, ईश्वर पंधरे, डॉ.मनीष पंधरे आदि उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन नीलकंठ चिचाम व उपस्थितांचे आभार प्रदर्शन शत्रुघ्न मरस्कोल्हे यानी मानले. गीता तुमडाम, तुष्मा तोडसाम, हेमलता आहाके, मिनाक्षी वट्टी, बिन्दू कोडवते, सीमा उइके, मनिषा कुंभरे, भावना उइके, सरिता भलावी, लता मडावी, शोभा कुसराम, मंजू उइके, रंजना उइके, बबिता कुंभरे, वनिता सलामे, छाया दुर्गे, अनिता नागभिरे, संगीता पुसाम, अनिता टेकाम, ममता नागभिरे, मंदा मड़ावी, योगिता गेडाम, नमिता फुलसुंगे, लता सयाम, कविता अडमाचे, सुनिता पुसाम, पिंकी कुंभरे, दिव्या उइके, आदित्य सलाम, सुमीत उइके, लोकेश कुसराम, पंकज कुंभरे यानी यशस्वीतेकरीता प्रयत्न केले.
पूढे बाजू मांडताना मार्गदर्शक बोलले की ” न्यायप्रिय महात्मा राजा रावण अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे व विविध गुणांचा समुच्चय आहे. राजा रावण महान दार्शनिक, संगीत तज्ज्ञ, राजनीतिक, शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट नगररचनाकार, समताधिष्ठित, समाजव्यवस्थेच्या उदगाता, साहित्यिक, न्यायप्रिय राजा अशा अनेक गुणांचा आविष्कार करणारा महानतम राजा होता. हजारो वर्षापासून मूलनिवासी आदिवासी त्याची पूजा करतात, त्याला आपला महानायक, शूरवीर योद्धा, महाज्ञानी, बलाढ्य शक्तीशाली विद्वान, अनेक शास्त्रांचा अभ्यासक व शंभुचा पुजारी मानतात. आजही रावण पूजा मेघनाथ पूजा करतात. तामिळनाडूमध्ये रावणाची 352 मंदिरे आहेत. सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे छत्तीसगढ, मध्यप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर राजा रावणाची पूजा केली जाते.अशा या महान राजाला इथल्या षड्यंत्रकारी वर्णांध व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे. परंतु सत्य लपून राहत नाही ते कधी ना कधी उघड होतेच. आदिवासी समाजातील व इतरही समाजातील संशोधक साहित्यिक यांनी रावणाचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर मांडला आहे. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे.





