
भंडारा– जिल्हा हा छोटा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यात नक्षलग्रस्त भागही मोडतो. त्यामुळे छोट्याशा जिल्ह्यातील जिल्हा बँकेने नक्षलग्रस्त आदिवासींना नेहमीच न्याय देण्याचे काम केले आहे. छोट्या जिल्ह्यात जवळपास तेराशे कोटींच्या ठेवी या बँकेत आहेत. जिल्हा बँकेने सर्वस्तरातील संस्थांना न्याय देण्याची भूमिका सदैव वठवली आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्हा बँकेत आढावा बैठकीला आले असतांना बँकेच्या मिटींग हॉलमध्ये समितीचे स्वागत सत्कारप्रसंगी बँकेविषयी प्रस्तावना कमिटीसमोर ठेवत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले.
३0 ऑक्टोबर रोजी विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख विधानसभा सदस्य दौलतराव दरोडा, अशोक उईके, श्रीनिवास वणगा, राजेश पाडवी, किरण सरनाईक, राजकुमार पटेल, भिमराव केराम, रमेशदादा पाटील, उपसचिव राजेश नारवी, अप्पर सचिव मोहन काकडे, जिल्हाधिकारी संदिप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मुन, सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर आदींसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी फुंडे म्हणाले, खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यातील आदिवासीबहुल लोकांना जंगल कामगार आदिवासींच्या माध्यमातून मदत करायची या उद्दिष्टाने जिल्हा बँक सदैव अशा लोकांना मदतीचा हात पुरवीत असते. महाराष्ट्रात प्रथमच जंगल कामगार संस्थांना जिल्हा बँकेने अँडव्हांस पेमेंट देण्याचे काम केले असून मजुर संस्थांना देखील पैसा पुरविला. विशेष म्हणजे जंगल कामगार संस्थांनी न चुकता ३१ मार्च अगोदरच बँकेत पैसे भरले. बिंदू नामावलीप्रमाणे २00९ च्या कर्मचार्यांच्या भरतीला मान्यता होती, ती दिली. आदिवासी महिला बचत गटांना प्राधान्य देवून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याची भूमिका बँकेने वठविली.
दि.१६ सप्टेंबर २0२१ स्टॉफीक पॅटर्न मंजुर झाले. त्यासाठी बँकेने आयुक्त कार्यालयात प्रस्तावही पाठवला. स्टॉफीक पॅटर्न मंजुर करून घ्यावा असा जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावही दिला. कोविडमुळे बँकेचा एनपीए कमी करण्याचा प्रयत्न करीत असून तरीही जिल्हा बँकेला पिक कर्जाचे प्रशासनाने दोनशे साठ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. तरीही जिल्हा बँकेने तिनशे साठ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट पुर्ण केले आहे. म्हणजेच शंभर कोटी चे उद्दिष्ट जास्त केले. अनुसूचित जमाती कल्याण समितीने जिल्हा बँकेला भेट दिल्याने या समितीचे प्रमुख दौलतराव दरोडा यांच्या निर्देशनानुसार आम्ही ठराव घेणार आणि येणार्या काळात नोकर भरती करू असे आश्वासन दिले.
सत्कार प्रसंगी आलेल्या समिती मधील सर्वांनीच जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे भरभरून कौतूक केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन माजी संचालक प्रकाश मालगावे यांनी केले. सत्कार समारंभा प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सदाशीव वलथरे, बँकेचे संचालक कैलाश नशीने, प्रशांत पवार, रामलाल चौधरी, विनायक बुरडे, अंजीरा चुटे, योगेश हेडाऊ, नरेंद्र बुरडे, प्रेमसागर गणवीर, विलास वाघाये आदी उपस्थित होते.





