
कोल्हापूर, दि. 31: दिव्यांगांनी आपली नैसर्गिक क्षमता वेळोवेळी सिध्द केली आहे. दिव्यांग बांधव हे मानव समुहातील महत्वाचा घटक आहेत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे महासैनिक दरबार हॉल येथे दिव्यांग रोजगार मेळाव्याचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, समाज कल्याण सभापती (जि.प.) श्रीमती कोमल मिसाळ, शिक्षण व अर्थ समिती सभापती श्रीमती रसिका पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, दिव्यांगांसाठी शासनाने शासकीय नोकरीत 3 टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. दिव्यांगांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शहरात लवकरच स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभे करण्यात येईल तसेच 45 हजार दिव्यांगांना डीबीटीच्या माध्यमातून 500 रू. देण्याची भूमिका घेण्यात आली असून ते पैसे लवकर वितरीत केले जातील, त्याचबरोबर जिल्ह्यातील दिव्यांगांना पात्रतेनुसार डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून, कोणताही दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित राहू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी सक्त सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
दिव्यांगांमध्ये नवनिर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. त्यांनी आपली ही क्षमता वेळोवेळी सिध्द केली आहे. समाजाने त्यांना मूळ प्रवाहात सामावून घ्यावे तसेच जिल्ह्यातील उद्योजकांनी मानवी भावनेतून दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यावेळी केले.
तर या रोजगार मेळाव्यातून दिव्यांगांना रोजगार मिळण्यास मदत होईल, असा आशावाद संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केला. याप्रसंगी तीन दिव्यांगांना प्रतिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते कुबडी वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजकांच्यावतीने अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार दीपक घाटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.
000000

नाना-नानी पार्क व कत्तलखान्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): कागल नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नाना-नानी ऑक्सीजन पार्क आणि अत्याधुनिक स्वरुपातील लहान जनावरांचा कत्तलखाना या दोन्ही उपक्रमांचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
कागल नगरपरिषदेच्या वतीने घनकचरा प्रकल्प परिसरात सुमारे 1 कोटी 35 लाख रुपये खर्च करुन हा अत्याधुनिक कत्तलखाना तर सुमारे 90 लाख रुपये खर्च करुन नाना-नानी ऑक्सीजन पार्कची उभारणी कागल शहरातील जनतेसाठी करण्यात आली.
यावेळी हे दोन्ही प्रकल्प नितांत सुंदररित्या उभे करण्यात आले असल्याची भावना पालकमंत्र्यांनी बोलून दाखविली. याप्रसंगी कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, प्रताप माने, प्रकाश गाडेकर, नपा मुख्याधिकारी पंडीत पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक-सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

राज्यात ‘कागल’ विकासाचा पॅटर्न – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): कागल शहरातील अत्याधुनिक विविध विकास कामे पाहिल्यानंतर राज्यात कागलच्या विकासाचा पॅटर्नचा बोलबाला झाल्याशिवाय राहणार नाही, असे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले. निमित्त होते कागल येथे शाहू वसाहत परिसरातील वड्डवाडी येथील चौथ्या टप्प्यातील 90 घरकुलांच्या लोकार्पण सोहळ्याचे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कागल शहर आणि तालुक्याच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही. कागल शहर हे विकास कामांच्या बळावर भविष्यात संपूर्ण राज्यात आपली स्वंतत्र वेगळी ओळख निर्माण करेल, असा आशावाद व्यक्त करुन मंत्री हसन मुश्रीफ हे खऱ्या अर्थाने लेाकाभिमुख नेतृत्व असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
राज्यातील 5 कोटी कामगारांपैकी सुमारे 4 कोटी 20 लाख कामगार असंघटीत असून त्यांच्या उत्कर्षासाठी आपण अखेरपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राज्यात लवकरच टॅक्सी, ट्रक, टेम्पो, रिक्षा चालकांसाठी, शेतमजुरांसाठी तसेच यंत्रमागधारक कामगारांसाठी मंडळ स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात 5 बांधकाम कामगारांना कीट (साहित्य) वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, मुख्याधिकारी पंडीत पाटील, नाविद मुश्रीफ, प्रताप (भैय्या) माने शशिकांत खोत, चंद्रकांत गवळी, विवेक लोटे, आशा माने, प्रकाश पाटील यांच्यासह कागल नगरपरिषदेचे नगरसेवक -सेविका, घरकुल लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




