33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News अनिल देशमुखांना अटक:रात्री 12.45 वा. कारवाई

अनिल देशमुखांना अटक:रात्री 12.45 वा. कारवाई

0
99

blank

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अखेर सोमवारी रात्री उशिरा सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर १२ तास त्यांची चौकशी सुरू होती. रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ७१ वर्षीय देशमुख यांच्यावर पैशांची अफरातफर (पीएमएलए) तसेच मुंबईतील बार आणि हुक्का पार्लर मालकांकडून दरमहा १०० कोटींची वसुली तसेच पोलिस बदल्यांमधील गैरव्यवहार असे आरोप आहेत. देशमुख यांनी अनेक प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अधिक चौकशीसाठी ताब्यात घ्यावे लागले, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच वेळा समन्स, याचिका फेटाळल्यावर हजर
परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीसंदर्भात आरोप केल्यानंतर ईडीमार्फत चौकशी सुरू झाली. मात्र अनिल देशमुख आणि कुटुंबीय अनेक महिन्यांपासून अज्ञातवासात होते. ईडीने देशमुख यांच्या निवासस्थानी पाच वेळा धाडी टाकल्या होत्या. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्धा येथील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. देशमुख यांना कार्यालयात हजर राहण्याबाबत ईडीने अनेकदा समन्स बजावले, परंतु ईडीसमोर हजर न राहता देशमुखांनी वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका शुक्रवारी फेटाळली गेली होती.

खंडणीप्रकरणी सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात
बिल्डर विमल अग्रवालकडून खंडणी वसुलीप्रकरणी चौकशी करण्यासाठी सोमवारी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीसिंगसह आणखी ४ आरोपी आहेत.

माझ्यावर आरोप करणारे परमबीरसिंग कुठे आहेत?
अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. त्यापूर्वी त्यांनी आपली भूमिका चित्रफितीद्वारे मांडली. त्यात ते म्हणतात, परमबीरसिंग भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या आहेत. माझ्यावर आरोप करणारी व्यक्तीच पळून गेली आहे. परमबीर यांच्याविरुद्ध पोलिस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझे याने परमबीरसिंगच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केले. परमबीर यांच्यासारख्या लोकांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप होत आहेत. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात असून याचे मला दुःख आहे, अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली.

blank