40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता सराफा दुकानात चोरी करणारी टोळी अटकेत

सराफा दुकानात चोरी करणारी टोळी अटकेत

0
76

blank

भंडारा-दिवाळीच्या दिवसामध्ये सराफा दुकानात दागिने चोरणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाच्या पथकाने भंडारा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून एका महिलेसह तीन आरोपींना ताब्यात घेतले असून आणखी एक आरोपी फरार असल्याचे समजते. विशेष म्हणजे या आरोपींच्या विरोधात जळगाव, वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहे. भंडारा शहरातील लेदे ज्वेलर्स या दुकानात 29 ऑक्टोबर रोजी 2 महिला 1 पुरुष यांनी प्रवेश करून हातचालाकी करून 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 टॉप्स लंपास केले होते. यासंदर्भात सराफा व्यावसायिकांनी भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भंडारा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाच्या पथकाने जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि पोलिस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक विवेक राऊत आणि अरविंदकुमार जगणे यांनी मिळून सीसीटीव्ही आणि अन्य माहितीच्या आधारे चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकीचा शोध घेतला. वाहन सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रेखा चव्हाण यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राऊत यांच्या नेतृत्वात एक पथक अकलूज ला रवाना झाले. रेखा चव्हाण हे आरोपी असल्याचे खात्री पटताच सोलापूर येथून रेखा चव्हाणसह संजय साळुखे व तात्या साळुखे अशा तिघांना 9 नोव्हेंबर रोजी अटक करून ताब्यात घेतले. या आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली बोलेरो आणि 7 ग्रॅमचे दागिने जप्त करण्यात आले.
सोबतच या आरोपींवर वर्धा जिल्ह्यातील कारंजा पोलिस स्टेशन अंतर्गत केलेल्या चोरीतील 10 ग्रॅम किंमतीचे मंगळसूत्रही जप्त करण्यात आले. वाहनासंह 3 लाख 86 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला. विशेष म्हणजे या आरोपींनी जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातही चोरी केली असल्याचे तपासादरम्यान कबूल केले आहे. या प्रकरणातील एक महिला आरोपी फरार असून लवकरच तिलाही ताब्यात घेण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी सांगितले.

blank