* शेतकऱ्यांची कुचंबणा त्वरित थांबवा- माजी जि.प. सभापती मोरेश्वर कटरे यांची मागणी
गोंदिया- जिल्ह्यात गाजावाजा करून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र एकही किलो धान या केंद्रावरून अजूनही खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा त्वरित थांबवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी केली आहे.
जिल्ह्यात पालकंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून ऑक्टोबर महिन्या अखेर पर्यंत सर्वत्र धान खरेदी केंद्रे सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र नोव्हेंबर महिना उजाडत असला तरी जिल्ह्यात अजूनही खरेदी केंद्र सुरू झाली नाही. धान खरेदी जिल्हा संघांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात आपल्या मागण्या पूर्ण होई पर्यंत जिल्ह्यात धान खरेदी केंद्रे सुरु करणार नसल्याचं सांगितलं आहे. एकंदरीत शासन आणि धान खरेदी जिल्हा संघटनेच्या वादात सामान्य शेतकरी होरपळत आहे. दिवाळीच्या आधी पासून धान मळणी होऊनही धान शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. आधीच उसनवारी घेऊन आपले जीवनयापण करणाऱ्या शेतकऱ्यावर मात्र मोठे संकट निर्माण झाले आहे. आधीच अस्मानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने वेळीच तोडगा काढत आठवडाभरात जिल्ह्यात सर्वत्र धान खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे, अन्यथा धान खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी जन आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा माजी जिल्हा परिषद कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी दिला आहे.





