
नागपूर, दि. 19 : रेशीम संचालनालयाच्या माजी संचालक भाग्यश्री बानायत यांनी रेशीम संचालनालयात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व सर्वांगीन कार्याची दखल घेऊन त्यांना ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना ऑनलाईन देण्यात आला.
जगातील ऑस्कर पुरस्काराचा धर्तीवर भारतात दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘स्कॉच’ नॅशनल ॲवार्ड आहे. नवी दिल्ली स्थित स्कॉच फाऊंडेशन यांच्या वतीने 2003 पासून स्कॉच ॲवार्ड दिला जातो. दि.13 नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑनलाईन सोहळ्यात हा पुरस्कार श्रीमती भाग्यश्री बानायत यांना जाहीर करण्यात आला.
रेशीम संचालक पदावरील सर्वांगीण कार्याची दखल घेऊन शासकीय प्रशासनात राबविलेल्या उत्कृष्ट उपक्रमांबद्दल या पुरस्कारात रजत पदक त्यांना देण्यात आले आहे. कठोर निकष व मूल्यांकनातून गव्हर्नन्स मध्ये दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्काच पुरस्कारावर यंदा महाराष्ट्रातून भाग्यश्री बानायत यांनी मोहोर उमटवली आहे.
सार्वजनिक क्षेत्र, शासकीय विभागात गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या अधिकारी व संस्थांची निवड समितीद्वारे मूल्यांकन, नागरिकांचे मतदान अशा परिमाणांवर कामांचे प्रमाणीकरण व परीक्षण करून कडक निकषांच्या मूल्यांकन प्रक्रियेद्वारे ‘स्कॉच’ पुरस्कारासाठी निवड करून सुवर्ण, रजत व कॉस्य पदक देण्यात येते. या प्रक्रियेमुळे इतर पुरस्कारापेक्षा ‘स्कॉच’ पुरस्कार आगळावेगळा व उल्लेखनीय ठरतो.
रेशीम संचालक असतांना राबविलेले उपक्रम व नाविन्यपूर्ण कामाबद्दल हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्रातून ‘गव्हर्नन्स’ मध्ये केलेल्या कामासाठी मिळाला आहे. रेशीम संचालनालयातील कामे ई-गव्हर्नंसद्वारे करण्यासाठी बरीच कामे ऑनलाईन करण्यात येत आहे. या कार्याची नोंद झाल्याचा आनंद असल्याचे भाग्यश्री बानायत यांनी स्पष्ट केले.





