
भाजपच्या शिष्टमंडळाने सीबीआय चौकशीसाठी दिले निवेदन
देवरी,दि.23ः-तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या टोयाटोला येथील रहिवासी सुरेश कैलास वल्के (वय ३६)हा आपल्या दोन मुली आणि एक मुलासह गुजरात येथील सुरत येथे मजुरीच्या कामासाठी गेलेला होता.परंतू १४ नोव्हेंबरला सदर तरुणाची त्याच्या मुलासंह हत्या करुन तलावात मृतदेह फेकण्यात आल्याच्या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे. माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसिलदारामार्फेत निवेदन दिले.
तालुक्यातील टोयाटोला येथील रहिवासी सुरेश कैलास वल्के हा आपल्या मुलगी कु.ग्रेसी(वय १३)कु.रुक्ष(वय ६) आणि मुलगा मोक्ष(वय ३)यांच्यासह गुजरातमधील सुरत या शहरात मजुरीसाठी गेला होता.यात विशेष म्हणजे सुरेशची पत्नी ही मुलाबाळांना सोडून तीन-चार वर्षाआधीच माहेरी गेली आहे.
सुरेश आणि त्याच्या मुलाबाळांची हत्या होण्याच्या घटनेच्या एक दिवसाआधी सुरेशने आपल्या काकाला पैशाची अडचण आहे. म्हणून मोबाइलवर संपर्क केला होता.परंतू लगेच दुसऱ्या दिवशी सुरेशचे मृतदेह सुरतच्या कंबरेज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतशिवारात आणि मुलांचे तलावात आढळल्याचे कुटूंबियांना सांगण्यात आले.
सदर घटना गंभीर असूनही आरोपीचा शोध लागला नसल्यामुळे सीबीआयमार्फत चौकशी करुन सदर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावे यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन पाठवण्यात आले.यावेळी मृतकाचे वडील कैलास वल्के, भाऊ मनोज वल्के, माजी आमदार संजय पुराम, ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, माजी नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमल येरणे, ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल बिसेन, आनंद नळपते, गजानन शिवणकर, विजय मडावी, महिला तालुकाध्यक्षा देवकी मरई, माजी तालुकाध्यक्षा नूतन सयाम, नमीता नेताम, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने आणि उपाध्यक्ष दिपक शाहू आदी अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.





