
तिरोडा, दि.24 : तिरोडा शहरात चोरी-घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पळवून नेण्याच्या घटना घडत आहेत. मात्र अशा प्रकरणातील चोर पोलिसांना गवसत नव्हते. पण 18 नोव्हेंबर रोजी भरदिवसा घरफोडी करून 69 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेवर हात साफ करणार्या आरोपीला 24 तासात अटक करण्यात आले. ही तिरोडा पोलिसांची यशस्वी कामगिरी आहे.
सविस्तर असे की, 18 नोव्हेंबर 2021 च्या रात्री 10.18 वाजता फिर्यादी अनिता उत्तम बनसोड (वय 50) रा. शास्त्री वॉर्ड तिरोडा यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात येवून घरफोडी झाल्याची तक्रार दिलेली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, ती सकाळी 7 वाजता आपल्या घराला कुलूप लावून आपल्या मुलीला भेटण्यास कोडेलोहारा, ढिवरवाडा येथे गेलेली होती. ती त्याच दिवसी सायंकाळी 6.30 वाजता घरी परत आली. तेव्हा तिला तिच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. तिच्या घरातील सोन्या-चांदीचे आणि नगदी असा एकूण 69 हजार रूपयांचा माल चोरट्यांनी पळविला होता. तक्रारीवरून कलम 454, 380 भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.तिरोडा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. कोणावर संशय आहे काय? असे फिर्यादी महिलेला विचारण्यात आले. मात्र फिर्यादीने कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे या गुन्ह्यात काहीही सुगावा पोलिसांकडे नव्हता. मग पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवून तांत्रिक पद्धतीने तपास सुरू केला.यातून 24 तासाच्या आत आरोपी चंद्रशेखर उर्फ चंदू हिरालाल मेश्राम (वय 48) रा. संत सजन वॉर्ड तिरोडा या चोराला पोलिसांनी अटक केली. त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे. ही तिरोडा पोलिसांची यशस्वी कामगिरी ठरली.
आरोपीची पोलीस कोठडी घेऊन त्याच्याकडून आतापर्यंत चांदीचे दागिने व नगदी असा एकूण 20 हजार 905 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली एक हातोडी व एक लोखंडी चिमटा जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हेगाराकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे, असे ठाणेदार योगेश पारधी यांनी सांगितले.सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार कवलपालसिंग भाटिया, चित्तरंजन कोडापे, पोलीस शिपाई दमाहे, लांडगे यांनी केली आहे.





