34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News ठाकरे सरकारकडून पगारवाढीची घोषणा, मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम

ठाकरे सरकारकडून पगारवाढीची घोषणा, मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम

0
64

blank

मुंबई | गेल्या 14 दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. तसेच ऐन दिवाळीत कर्मचारी संपावर गेल्याने आणि महाराष्ट्रातील लाल परी बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अशातच आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी करीत आहेत. राज्य सरकारने विलीनकरणावर निर्णय न घेता पगारवाढीचा पर्याय पुढे करून दिला. असे असले तरी कर्मचाऱ्यांनी याबाबत संतप्त भूमिका घेतली. अनिल परब यांनी मोठी घोषणा केली असली तरी आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी अद्यापही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

दरम्यान, एसटी कर्मचारी उद्या सकाळी आपला निर्णय जाहीर करणार आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन संपावर निर्णय जाहीर करणार, अशी माहिती गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन कसे असेल?

1. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.

2. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.

3. ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.

4. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.

काय म्हणाले अनिल परब?

विलिनीकरणाच्या मागणीवर शासनाची उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याची आहे. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य करू. सरकारच्या या निर्णयामुळे तिढा निर्माण झाला होता. पण हा संप दिवसेंदिवस लांबत चालला होता. त्यामुळे राज्यातल्या ग्रामीण जनतेची, शालेय आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली होती.

सरकारकडून आम्ही प्रस्ताव ठेवला की विलिनीकरणाचा निर्णय समितीने दिला, तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंवा होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही. म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही पगारवाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे.

परिवहन मंत्र्यांकडून काल अंतरिम पगारवाढीची ऑफर
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील 15 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी काल पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अनिल परब यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत अंतरिम पगारवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडली.

blank