
गडचिरोली-प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर घरकुलाचा निधी खात्यावर जमा केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ८ हजारांची लाच स्वीकारताना आरमोरी नगर परिषदेचा कंत्राटी अभियंत्यास बुधवार, १ डिसेंबर रोजी नगरपरिदेतील अभियंत्याच्या कक्षात रंगेहात अटक करण्यात आली. प्रदीप देवराव मेर्शाम (वय ३0) असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी अभियंत्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसान तक्रारदार यांच्या वडीलाचे नावे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलाची निधी त्यांच्या खात्यावर जमा केल्याचा मोबदला म्हणून आरोपी अभियंता दीपक मेर्शाम याने तक्रारदाराकडे १0 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ८ हजार देण्यात ठरले. परंतु, तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सदर विभागाने तक्रारीची शहानिशा करून बुधवार, १ डिसेंबर रोजी आरमोरी नगर परिषद येथे सापळा रचून लाचखोर अभियंता दीपक मेर्शाम याला त्याच्याच कक्षात तक्रारदाराकडून ८ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. आरोपी विरुद्ध आरमोरी पोलिस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, पोलिस हवालदार नथ्थु धोटे, नापोशि राजेश पदमगिरीवार, स्वप्नील बांबोळे, किशोर जाैंजाळकर, पोशि श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, मपोशि जोत्सना वसाके, चानापोशि तुळशिराम नवघरे यांनी केली.





