
नवी दिल्ली-देशात गेल्या तीन वर्षांत दरडोई उत्पन्नात केवळ तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने संसदेत गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीमुळे हे स्पष्ट होऊ शकले. सरकारने राज्यवार प्रती व्यक्तीच्या उत्पन्नाची गेल्या तीन वर्षांतील नोंद घेतली आहे का, अशी विचारणा सांख्यिकी विभागाकडे करण्यात आली होती. ग्रामीण व शहरी व्यक्तीच्या उत्पन्नात किती तफावत आहे? त्यावर सरकारने काही माहिती दिली. त्यानुसार २०१८ -१९ ते २०२०-२१ दरम्यान दरडोई वार्षिक उत्पन्नात तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे, असे सरकारने नमूद केले. २०१८-१९ मध्ये प्रती व्यक्ती वार्षिक उत्पन्न १,२५, ८८३ रुपये होते. २०२०-२१ मध्ये ते १, २८,८२९ रुपये झाले. कोरोनाच्या आधी २०१९-२० मध्ये उत्पन्नात वाढ होऊन ते सुमारे ९ हजार रुपयाने वाढून १,३४,१८६ रुपये झाले होते. त्यानंतर कोरोना येताच उत्पन्नात २०२०-२१ मध्ये सुमारे ६ हजार रुपयांनी घट झाली. नंतर ते १,२८, ८२९ रुपयांवर आले.
४९३४ रेल्वेमध्ये आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावले
भाजप खासदार मनेका गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर रेल्वेमंत्री अश्विनी महाजन म्हणाले, देशातील ४९३४ या प्रवासी रेल्वेला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशातील ८३८ रेल्वेस्थानकांवरदेखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वाधिक सीसीटीव्ही कॅमेरे पश्चिम विभागात लावण्यात आले आहेत. ११०४ सीसीटीव्ही कॅमेरे या विभागात लावले. सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यामुळे गुन्हेगारी घटना कमी झाल्याचा अनुभव आहे का, असा प्रश्नही विचारण्यात आला होता.काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात गुगल व फेसबुकच्या महसुलावर निगराणीचा विचार आहे का, असा प्रश्न विचारला होता. सरकार ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील जोखमीच्या बाबत सजग आहे. सोशल मीडिया समन्वय योजनेवर सरकार विचार करत आहे.





