|
गडचिरोली–जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिस दादारोला खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातल युवक-युवतींना दुचाकी व चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देऊन १३५ युवक-युवतींना मोफत वाहनचालक परवाना वितरण करून त्यांना स्वयंरोजगारासाठी आत्मनिर्भर करण्यात आले.
जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी गडचिरोली पोलिस दादारोला खिडकीच्या माध्यमातून पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी व चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणाचे ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २0२१ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणा आज ७ डिसेंबर रोजी समारोप करण्यात आला.
आयोजित एक महिना कालावधीच्या दुचाकी व चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणात गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, धानोरा, जिमलगट्टा, भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या उपविभागातील अतिदुर्गम असलेल्या भागातील १३५ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. आज समारोपीय कार्यक्रमात सहभागी झालेल्या १३५ युवक-युवतींना गडचिरोली पोलिस दलामार्फत वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांना मोफत परवान्याचे वितरण करून प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. दरम्यान प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त करीत पोलिस दलाचे आभार मानले. समारोपीय कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस स्टेशन, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्राचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार व सर्व पोलिस अंमलदारांनी विशेष पर्शिम घेतले.
|