37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र स्वतंत्र विदर्भ तारांकित प्रश्‍नाला विधिमंडळाची बगल

स्वतंत्र विदर्भ तारांकित प्रश्‍नाला विधिमंडळाची बगल

0
24

blank

नागपूर दि.११ – राज्याचे विभाजन आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने विधिमंडळाच्या कामकाजातून हा प्रश्‍न वगळला असल्याचे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी गुरुवारी जाहीर केले.
कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या अनुषंगाने तारांकित प्रश्‍न विधिमंडळ सचिवालयाकडे पाठविला होता. ठाकरे यांचा प्रश्‍न बुधवार 9 डिसेंबरच्या तारांकित प्रश्‍नांच्या यादीत 11व्या क्रमांकावर असल्याचे विधानमंडळ सचिवालयाने त्यांना कळविले होते. मात्र सभागृहाचे कामकाज काल प्रत्यक्षात सुरू होण्याआधी तारांकित प्रश्‍नाच्या यादीत 11 व्या क्रमांकावर दुसराच प्रश्‍न असल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ठाकरे यांनी आज हा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रश्‍न वगळल्याचा आरोप केला. अशा पद्धतीने विधिमंडळाचे कामकाज होणार असेल, तर संसदीय लोकशाही व्यवस्थेचा घोर अपमान असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर स्पष्टीकरण देताना वसंत डावखरे यांनी संबंधित विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने विधिमंडळाच्या अधिकारात हा सदरचा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या राज्याचे महाभियोक्‍ता श्रीहरी अणे यांना बडतर्फ करण्याची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेत केली. कॉंग्रेसच्या संजय दत्त यांनीदेखील अणे आणि राज्य सरकारवर हल्ला चढविला. दत्त यांनी अणे प्रकरणावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला होता. दत्त यांनी हा विषय उपस्थित करून श्रीहरी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. 

blank