
तिरोडा, दि.18 : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक शांततेत पडावी, यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशानुसार तिरोडा पोलीस सातत्याने वॉश आऊट मोहीम राबवित आहे. या मोहिमेंतर्गत आज मुरमाडी जंगलात दारू अड्ड्यावर तिरोडा पोलिसांनी छापा मारून तब्बल 83 हजार 900 रूपयांचा माल जप्त केला आहे.
सविस्तर असे की, पोलीस निरीक्षक योगेश पारधी आज शनिवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या सिल्ली परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान गोपनीय सूत्रदाराकडून माहिती मिळाली की, मुरमाडी जंगलात नाल्याचे काठावर हातभट्टीद्वारे मोहफुलांची दारू काढत आहेत. या माहितीवरून अधिक पोलीस कुमक बोलावून सदर नमूद ठिकाणी छापा टाकण्यात आला.
त्यामध्ये संजय सोविंदा बरेकर (वय 35) रा. रामाटोली-सिल्ली हा मोहफुलांची दारू काढण्याची भट्टी लावून दारू काढताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून खालीलप्रमाणे नमूद मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
मुरमाडी जंगलात ₹83,900 चा मुद्देमाल जप्त
(1) 2 नग गॅस सिलेंडर. (2) 2 नग लोखंडी गॅस शेगडी. (3) 2 नग जर्मन घमेला. (4) 2 नग लाकडी टवरा. (5) 1नग प्लास्टिक ड्रम. (6) 2नग लोखंडी ड्रम. (7) 35 प्लास्टिक चुंगडीत 875 किलो सडवा मोहाफुल. (8) 2 लोखंडी ड्रममध्ये सडवा. (9) 100 लिटर मोहफुलांची दारू. असा एकूण 83 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सोबत पोलीस हवालदार भाटिया, नापोशि लांडगे, दमाहे, अंबुले यांनी केली.





