
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर आपल्याकडे आपण म्हणताय की बहुमताचा आकडा मोठा आहे तर एवढी भिती का आहे. केवळ एक दिवसाचा कालावधी का देण्यात आला. कालावधी कमी करण्याचा नियम आपल्याला बदलता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी म्हटलं की, जर रेटून नेणार असाल तर आम्ही कायदेशीर लढाई करणार आहोत. आपल्या आमदारांवर एवढा अविश्वास का आहे, असेही ते म्हणाले.
यावर आमदार नाना पटोले म्हणाले की, घोडेबाजार बंद व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. आपण पहिल्यांदा आपण नियम बदलत आहोत का? या नियम बदलाला आमचा पाठिंबा आहे, असे पटोले म्हणाले.
यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपली बाजून मांडताना बेईमानी हा शब्द वापरला. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. यावर मुनगंटीवार म्हणाले की, बेइमानी हा शब्द का मागे घ्यायचा. त्यांनी घोडेबाजार हा शब्द वापरला. सर्व सदस्यांचा त्यांनी अवमान केला. हा काय घोड्यांचा तबेला आहे का? नानाभाऊ दहा वर्षे भाजपमध्ये राहिलात एवढे संस्कार केले ते तर दाखवा, असे मुनगंटीवार म्हणाले.
होऊ द्या चर्चा; नाना पटोलेंचे प्रतिआव्हान
राज्यात सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे विधानसभेत उमटले. संपुर्ण शासकीय यंत्रणा सडलेली असून या सरकारच्या काळात एकही परिक्षा घोटाळ्याच्या बाहेर झाली नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. न्यासा कंपनीला अपात्र केल होत मात्र त्यानंतर त्यांना पात्र करण्यात आल्याचे सांगताना सभागृहात गुरुवारी चर्चेची मागणी फडणवीस यांनी केली. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी चर्चेची मागणी करताना या घोटाळ्याची तार कुठपर्यंत जात आहे हे समजले पाहिजे अशी मागणी केली.
मागील काही दिवसांपासून राज्यात भरती परीक्षेच्या मुद्यावरून गोंधळ सुरू आहे. विधीमंडळ अधिवेशनात याचे पडसाद उमटणार असल्याचे म्हटले जात होते. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा घोटाळ्याच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली. आरोग्य भरती परीक्षेत मोठा गोंधळ झाला. न्याया या कंपनीला अपात्र केले होते. त्यानंतर ही पुन्हा काही दिवसांनी या कंपनीला कंत्राट देण्यात आले. इतर कंपन्यांनाही परीक्षा घेण्याचे कंत्राट देता आले असते असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीला काळ्या यादीत होती. या कंपनीला तीन महिन्यात पुन्हा या कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आरोग्य खात्याच्या भरती परीक्षेतील उमेदवारांना परीक्षा केंद्रही इतर ठिकाणची आली होती. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी प्रसिद्ध केलेल्या ध्वनिफितीमध्ये दलालाने अनेक दावे केले होते. एकट्या अमरावती जिल्ह्यात 200 जणांनी दलालाला पैसे दिले होते. संपूर्ण शासकीय यंत्रणा सडलेली आहे. प्रशांत बडगीरे यांच्या वाहन चालकाकडे प्रश्नपत्रिकेचा संच सापडला. या घोटाळ्यांवर चर्चा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.