शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्याची मागणी
देवरी,दि.22-कोरोना संक्रमणामुळे गेल्या 2 वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता कुठे शाळा सुरू झाल्या आहेत. पण विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वाहतुक सेवा नाही. आता तरी सरकारने विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान करू नये. यासाठी मानवविकाससह सर्वच एसटी बसेस लगेच सुरू कराव्या, अशी मागणी माजी जि.प.सदस्या गोमती तितराम यांनी शासनाकडे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या माहितीप्रमाणे, देशात कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून सर्वत्र शैक्षणिक कार्यक्रम थांबले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी तर मागील अभ्यास सर्व विसरले आहेत. अशात आता कुठे शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातीलच नव्हे तर अनेक ठिकाणाहून शाळकरी विद्यार्थी हे एसटीच्या बसेसने शिक्षणासाठी बाहेरगावी जात असतात. अशा विद्यार्थ्यांची खासगी प्रवासी वाहतुक करणारे प्रचंड लूट करीत आहेत. असे असून ही प्रवाशी साधन नसल्याने बहुतांश मुळे शाळा सुरू झाल्यावर सुद्धा घरीच आहेत. विद्यार्थी तासन््तास ताटकळत रस्त्यावर उभे राहत आहेत. विशेषतः विद्यार्थिनींना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत.शैक्षणिक सत्र अर्ध्यापेक्षा अधिक संपला तर काहींच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत.
देशाचे भविष्य वाहतुक व्यवस्थेअभावी बर्बाद होत आहे. ही होणारी प्रचंड हानी रोखण्यासाठी शासन आणि कर्मचारी संघटना यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अन्यथा भावी पिडीचे भवितव्य अंधार गर्तेत जाईल.