
मुंबई,दि.24ः विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. त्यानुसार आता येत्या 27 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर 28 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
भाजपने देखील कंबर कसली असुन, या निवडणुकीत भाजपकडूनही आपला उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची दाट शक्यता आहे. आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला सत्ताधारी महाविकास आघाडीतील आणि भाजपातील प्रमुख नेते उपस्थित होते.
आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीत अधिवेशाचा कालावधी एका आठवड्यासाठी वाढून मिळावे, अशी मागणी करण्यात आली. राज्यसरकारने अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अधिवेशन आणखी आठ दिवस वाढवण्यात यावे. अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती.
मात्र राज्यसरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन नियोजित वेळेप्रमाणे 28 डिसेंबरलाच संपणार आहे. अधिवेशाचा शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
12 आमदारांचे निलंबण मागे घेऊनच निवडणूक घ्या
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी भाजप देखील निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. 12 आमदारांचे निलंबण मागे घेऊनच निवडणूक घ्या. अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. भाजपकडून अधिवेशनाचा कालावधी देखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र राज्यसरकारने त्याला विरोध केला आहे.





