
‘मशीहा’ हा शब्द माहीत नाही असा माणूस विरळाच. चित्रपटातील, कादंबरीतील, एखाद्या कथेतील नायक जो गरीबांच्या वतीने लढतो, ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळवून देतो, गरजवंतांच्या गरजा भागवण्यात पुढाकार घेतो त्याला ‘मशीहा’ अशी उपाधी दिली जाते. पण तो कोण आहे ज्याच्यासाठी ही उपाधी प्रथम वापरण्यात आली? आपली दिनदर्शिका इसवी सन आणि इसवी सन पूर्व ज्याच्या जन्मामुळे विभागली गेली तो येशू ख्रिस्त हा खराखुरा मशीहा आहे. परमेश्वर प्रेरित पवित्र शास्त्रात आपल्याला त्याचे जीवन चरित्र वाचायला मिळते.
प्रारंभी देवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा ती परिपूर्ण होती. असे असताना देवाने निर्माण केलेल्या आदाम व हव्वा या पहिल्या जोडप्याने देवाचे आज्ञाउलंघन केले आणि परिणामस्वरूप जगात पाप आले. या जगाला पापमुक्त करण्यासाठी सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराने त्याच्या नेमलेल्या वेळी आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवले त्या पुत्राचे नाव होते येशू. संपूर्ण मानवजातीला पापापासून मुक्त करणार्या ज्या मशीहाची लोक आतुरतेने वाट पाहत होते तो मशीहा होता येशू ख्रिस्त. शोमरोनी स्त्री येशूशी बोलताना म्हणाली, “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल.” येशू तिला म्हणाला, “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे” (योहान 4). अंद्रिया नामक एका व्यक्तीने त्याचा सख्खा भाऊ शिमोनाला सांगीतले की, “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे” (योहान 1).
प्रभू येशूने लोकांना बंधनमुक्त करून आपण मशीहा असल्याचे सिद्ध केले. ‘मशीहा’ या हिब्रू शब्दाचा अर्थ आहे “ज्याला अभिषेक झाला आहे.” येशूला प्रत्यक्ष भेटलेल्या किंवा त्याच्याविषयी ऐकलेल्या अगणित लोकांनी कबूल केले की तो देवाचा अभिषिक्त आहे. प्रभू येशू म्हणाले, “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, भग्नहृदयी जनांस बरे करण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी” (लूक 4). लूक अशी साक्ष देतो की, “नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता” (प्रेषित 10). मत्तयाने नोंद केली की, येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला. जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले (मत्तय ४). मेलेल्या लोकांना येशूने मरणातून उठविले (योहान 11).
प्रभू येशूने आपल्या शिकवणीतून आणि जीवनातून मशीहा असल्याचे सिद्ध केले. इतरांना क्षमा करा. . . तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा . . . तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका . . . जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. . . अशी शिकवण येशूने दिली. येशूचे बोलणे ऐकून, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता (मत्तय ४). प्रभू येशूने केवळ शिकवण दिली नाही तर ते त्याप्रमाणे जीवन जगले. आदर्श जीवनाचा त्यांनी कित्ता घालून दिला.
प्रभू येशूने मरणातून जिवंत होऊन मशीहा असल्याचे सिद्ध केले. प्रभू येशूला नैसर्गिक मरण आले नाही. इझ्राएल देशातील यहूदी पुढाऱ्यांनी त्यांच्यावर चुकीचे आरोप ठेऊन रोमी शासकातर्फे वधस्तंभावरचे क्रूर मरण सोसण्यासाठी रोमन सैनिकांकडे सोपवून दिले, प्रभू येशू त्यांच्या तावडीतून सहज सुटू शकले असते पण संपूर्ण मानवजातीसाठी त्यांचे रक्त सांडणे अगत्याचे होते कारण शास्त्र सांगते “रक्त सांडल्यावाचून पापक्षमा नाही.” (शास्त्र सांगते, “येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.”) वधस्तंभावर मरण पावल्यावर प्रभू येशूचा देह एका कबरेत ठेवण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी ते मरणातून उठले. मरण सोसल्यानंतरही त्यांनी त्यांच्या शिष्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत ते त्यांना दर्शन देत राहिले व त्यांनी त्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या. ते मरणातून उठल्यानंतर पाचशे पेक्षा अधिक लोकांना दिसले, आणि मग त्यांच्या अनुयांच्या डोळ्यांदेखत स्वर्गात गेले. त्यांनी त्यांच्या अनुयायींना अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी परत येणार आहेत.
– राज धुदाट
कवितासागर फीचर्स, जयसिंगपूर
७०८३९००९६६, ९९७५८७३५६९





