
मुंबई-राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्ल्यांची नावे देण्यात येणार आहेत. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांचे नामांतर करण्यात आले. त्यामुळे आता मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांना राज्यातील प्रसिद्ध गड आणि किल्यांचे नावे मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अ ६ बंगल्याला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड असे नाव देण्यात आले. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या इ २ बंगल्याला र%सिंधु असे नाव देण्यात आले.
गेले कित्येक दिवस मंत्रालयांच्या समोरचे बंगले आणि त्यांची नावे ही गडकिल्यांची असावी यासाठी शिवप्रेमी संघटना आणि शिवप्रेमी प्रयत्न करत होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. मला सांगताना आनंद होतोय की, सर्व मंत्र्यांची बंगले ही गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखली जातील. उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नावं बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. शिवप्रेमींची मागणी मान्य झाली त्याबद्दल समाधान व्यक्त करतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.
राज्य सरकारने मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड आणि किल्यांचे नाव देण्याचे ठरविल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचंही नाव बदलणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.





