
तिरोडा : तालुक्यातील ग्राम मांडवी येथे 6 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने त्या बालिकेवर पंधरा दिवसात अनेकदा अत्याचार केले. या प्रकरणात पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे मांडवी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडवी येथील युवक मुक्तानंद चिंतमन दमाहे (वय 22) याने घराशेजारी राहणार्या 6 वर्षीय बालिकेला आपल्या घरी नेवून पंधरा दिवसात तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत तू कुणास काहीही सांगू नको, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित बालिकेने भीतीपोटी ही बाब सांगितली नाही. मात्र 21 तारखेच्या रात्री पोट दुखत असल्याची तक्रार तिने आईकडे केली. त्यातच शेजारच्या मुक्तानंद याने मला आपल्या घरी नेवून समोरचे दार बंद करून माझे सर्व कपडे काढून अत्याचार केले व याबाबत कुणालाही सांगू नको, असे बजावल्याचे बालिकेने आईला सांगितले.या आधीही वारंवार पोट दुखत असल्याचे मुलीने आईला सांगितले होते. मात्र त्याकडे आईने लक्ष दिले नव्हते. पण आज मुक्तानंद याने वारंवार आपल्यावर दुराचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. त्यावरून आईने तिरोडा पोलीस ठाण्यात येवून बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार दिली. तिरोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे करीत आहेत.





