
भंडारा,दि.28 : – कोका वन्यजीव अभयारण्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर मोठा वाघ मृतावस्थेत आढळता . यामुळे वनविभागात खळबळ माजली आहे . माहिती मिळताच वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी व मानद वन्यजीव सदस्य घटनास्थळी दाखल झाले. मृतावस्थेतील वाघाचे नाव रूद्र ( बी -२ ) असल्याचे वन्यजीव प्रेमीकडून सांगितले जात आहे . सविस्तर असे की , पलाडी येथे अभिजित व अँड शिशीर वंजारी यांच्या शेताजवळ वाघ मृतावस्थेत असल्याचे दुपारी २.३० वाजताच्या सुमारास काही लोकांना दिसून आले . घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली . लागलीच घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली . तातडीने विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले . मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचे नाव रुद्र असल्याची माहिती आहे. विद्युत प्रवाहाने वाघाचा मृत्यू झाला , असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . कोका अभायरण्यापासून अवघ्या चार किलोमीटरवर वाघ मृतावस्थेत आढळल्याने वन विभागात खळबळ माजली आहे . विशेष म्हणजे वाघ मृतावस्थेत सापडला तेथे सोलर फेन्सींग खांबांसाठी खड्डे खोदलेले आहेत .
वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तथा जिल्हा टायगर सेलचे अध्यक्ष वसंत जाधव व भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.बी. भलावी टिमसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले . संपूर्ण घटनेवर ते जातीने लक्ष ठेवून आहेत . तसेच सहाय्यक उपवनसंरक्षक नागुलवार , वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर , अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . गुणवंत भडके , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . विठ्ठल हटवार , वन्यजीव उपायुक्त अनू बरकर , डॉ . दीपक पवार , डॉ . गिरीश वैद्य , डॉ . मुडीगुंटीवार , डॉ . गिरीष वैद्य , मानद वन्यजीव सदस्य शहीद खान व नदीम खान उपस्थित होते .





