
भंडारा,दि.29ः- शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यात अडकून मृत्यू झालेल्या रुद्र बी-2 वाघाच्या मारेक-याला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात भंडारा वनविभाग आणि पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चांदोरी येथील दिलीप नारनवरे याला अटक करण्यात आली असून आणखी तीन आरोपी असल्याची माहिती भंडा-याची उपवनसंरक्षक भलावी यांनी पत्रकार परिषदेतून दिली.वाघाच्या मृत्यू प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभुमीवर माहिती देण्यासाठी आज शनिवार 29 रोजी उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.ते भंडारा तालुक्यातील भिलेवाडा गावालगत एका शेतात 28 जानेवारी रोजी एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. रूद्र बी-2 नावाच्या वाघाच्या मृत्युनंतर वन विभागाने पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता वाघाचा मृत्यू हा विजेच्या लावलेल्या सापळ्यात अडकून करंट लागल्याने झाल्याचे जवळपास उघड झाले होते.ते त्यादृष्टीने करण्यात आलेल्या तपासादरम्यान वनविभाग आणि भंडारा पोलिसांनी भंडारा तालुक्यातील चांदोरी येथील दिलीप नारनवरे इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा सापळा त्यानेच रचला होता याची कबुली त्याने दिली.
दिलीप व त्याचे सहकारी रानडूक्कर व अन्य वन्य प्राण्यांची शिकार करून मांस विक्रीचा व्यवसाय करायचे. याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर त्यादृष्टीने केलेल्या तपासातून आरोपीपर्यंत पोहचण्यात यश आले. दिलीप याला घेऊन वन विभागाने घटनास्थळी जाऊन अधिक तपास केला. यावेळी सापळा रचण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जवळील शेतात तणसाच्या ढिगा-यात लपवून ठेवण्यात आले होते.ते साहित्य दिलीप याने दाखविल्याचे यावेळी भलावी यांनी सांगितले. आरोपीला शोधण्यासाठी वनविभाग, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्याचे उपवनसंरक्षक भलावी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मानद वन्यजीव सचिव नदीम खान, शाहीद खान
उपस्थित होते.दरम्यान आज सकाळी मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर गडेगाव आगार परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. गुणवंत भडके, डॉ. अनू वरारकर, डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. गिरीष वैद्य व अन्य अधिकारी उपस्थित होते.





