
पुणे – महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. विविध स्तरांतून सरकारच्या या निर्णयाचा विरोध सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर भाष्य केले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नसून निर्णय बदलला तर वाईट वाटण्याचे कारण नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
कोरोनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात केल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी वाईन विक्रीच्या निर्णयावर भाष्य केले. सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नसल्याचे शरद पवारांनी म्हटले. जर अनेक स्तरातून सरकारच्या निर्णयाला विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी, त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार पुढे म्हणाले की, देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. नाशिक जिल्ह्यात देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे होते. 18 वाईनरी या जिल्ह्यामध्ये आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना वाईनरींच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळते. पण त्याला विरोध होत असेल, तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला, तरी वाईट वाटण्याचे कारण नसल्याचेही पवार यांनी म्हटले.
शरद पवार यांनी गोविंदबागेत पत्रकारांशी संवाद साधताना पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबतही आपले निरीक्षण सांगितले. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर शेतकरी आंदोलनाला बसले होते. आंदोलनामुळे केंद्र सरकारने कायदे मागे घेतले. पण त्यांच्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. भाजप सरकारला याची किंमत मोजावी लागणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.





