
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतानाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अहमदनगरमधील पाथर्डी येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलीय. यासंदर्भातील निवदेनही पाथर्डी पोलीस स्थानकामध्ये तसेच तहसीलदारांकडे देण्यात आलं आहे.
या आंदोलनामध्ये बहुजन वंचित आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक किसन चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “विरोधी पक्ष नेत्यांची वैचारिक वाढ, वैचारिक जडण घडण रेशीम बागेत झालेले, आरएसएसमध्ये वाढलेले देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक, महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लीम अतीशय शांततेचं वातावरण असताना या दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून अशी वक्तव्य करतायत. काही कारण नसतानाही शूर वीर योद्धे असणाऱ्या टिपू सुलतान यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं,” असा आरोप चव्हाण यांनी केलाय. तसेच “टिपू सुलतान धर्मांध होते, हिंदूविरोधी होते, हिंदूंवर अत्याचार करत होते, अशा पद्धतीचं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय,” असंही चव्हाण म्हणाले.




