
सडक अर्जुनी –वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत कार्यालयाच्या पथकाने शेंडा/कोयलारी परिसरातील शेतातील झाडे विनापरवानगी झाडे कटाई प्रकरणी २७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करुन झाडे शासनजमा केली होती. या प्रकरणातील आरोपींना शेंडा सहवनक्षेत्राच्या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी अटक केली.
शेतातील झाडे शेतकर्यांकडून विकत घेऊन व वनविभागाची परवागनी घेऊन कटाई करता येते. मात्र तालुक्यात शेतातील झाडे विनापरवानगी कटाई करुन साठवणूक केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यासंदर्भात शेंडा सहवनक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचार्यांनी शेतशिवारात गस्त वाढवून चौकशी सुरु केली. दरम्यान २७ जानेवारी रोजी शेंडा/कोयलारी जवळील शेतात विनापरवानगी झाडांची अवैध कटाई होत असल्याची माहिती वन कर्मचार्यांना मिळाली. माहितीच्या आधारे कर्मचार्यांनी धाड टाकली असता अवैधरित्या झाडे कटाई केल्याचे आढळले. याप्रकरणी शेतकर्यावर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४, कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करुन कटाई केलेली झाडे डोंगरगाव/डेपो लाकूड आगारात जमा केली होती. दरम्यान ७ फेब्रुवारी या प्रकरणात वनरक्षक नरेश पातोडे, दिलीप माहुरे यांनी आरोपी लेमन पंधरे रा. शेंडा, अक्षय बन्सोड रा. मसरामटोला, भरतराम मरस्कोल्हे, रा. कोयलारी, सुधाकर सयाम, रा. मसराम टोला व ईतर इसमांना अटक केली आहे. पुढील तपास फिरोज पठान क्षेत्रसहाय्यक हे करीत आहेत.





