41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता शिवजयंती दिनी पोलिसांची अनोखी भेट | चोरीस गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने व...

शिवजयंती दिनी पोलिसांची अनोखी भेट | चोरीस गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने व टीव्ही फिर्यादीला केले परत

0
46

blank

अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव येथील ज्ञानेश्वर पांडुरंग शहारे यांच्या घरी कुणीही नसताना 16 जानेवारी 2022 रोजी पहाटे आरोपींनी घरफोडी केली. त्यात त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व एक 43 इंची कलर टीव्ही चोरून नेले होते. या चोरीचा संपूर्ण तपास करून चोरीस गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने व टीव्ही चोरांकडून पोलिसांनी हस्तगत केले. तसेच न्यायालयाच्या फिर्यादीला परत केले. शिवजयंती दिनी पोलिसांची ही अनोखी भेट ठरली.

सविस्तर असे की, पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेले भौतिक पुरावे, गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून तसेच तांत्रिक व शास्त्रीय माहितीच्या आधारे सर्व 3 आरोपी फरदिन राजीक शेख रा. वडसा, सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे रा. राजुरा, विकास शर्मा रा. वडसा यांचा शोध घेऊन दुर्ग छत्तीसगढ येथून अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून सर्व सोन्या-चांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही देखील हस्तगत केले होते.

न्यायालयाने जप्त केलेले सोन्याचांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही फिर्यादीला परत देण्याचे आदेश केले होते. त्यावरून शनिवारी अर्जुनी-मोर पोलिसांनी फिर्यादीला पोलीस ठाण्यात बोलावून सर्व सोन्याचांदीचे दागिने व 43 इंची कलर टीव्ही त्यांच्याकडे सुपूर्त केलेले आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस हवालदार गोंडाणे, पोलीस नाईक प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम, राहुल चीचमालकर, पोलीस शिपाई लोकेश कोसरे, मोहन कुहीकर यांनी केले. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सायबर सेल गोंदिया येथील पोलीस नाईक दीक्षित दमाहे यांनी मोठी मदत केलेली आहे.

blank