
गोंदिया – चंद्रपूर – बल्लारशहा मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी तसेच रेल्वेसंदर्भातील इतर मागण्यांसाठी मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देसाईगंज येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भाकपचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव डॉ. महेश कोतवार, हौसलाल रहांगडाले, देवराव चवळे, हिवराज उके, एड. जगदीश मेश्राम, विनोद झोडगे, मिलिंद गणवीर, मिनाक्षी सेलोकर, रमेश उप्पलवार आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
गोंदिया- चंद्रपूर रेल्वेमार्गावर पूर्वी तीन ते चार फेऱ्या धावत होत्या. परंतु कोरोना संसर्गामुळे सर्व गाड्या बंद करण्यात आत्या, अलीकडेच केंद्र आणि राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु रेल्वेची संख्या वाढवण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचारी, व्यापारी, व्यावसायिक आणि गोरगरीब प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. वडसा आणि सौंदड येथे थांबा द्यावा, वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे, गडचिरोली-सिरोंचा-हैद्राबाद रेल्वे मंजुरी द्यावी, ब्रम्हपुरी रेल्वे क्रासिंगवर उडाणपूल बांधावा इत्यादी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात सिंधू कापकर, प्रकाश खोब्रागडे, संजय वाकडे, प्रशांत खोब्रागडे, सुरेश सोनटक्के, सचिन मोटकुरवार, सुरेश बारसागडे, प्रकाश ठलाल, तुलाराम नेवारे, केवळराम नागोसे, परसराम आदे, पंढरी मेश्राम, गीताबाई शेंडे, मोलन कांबळे, धनराज रोहनकर, डंबाजी नरूले, हरिदास मोंगरकर, अमोल दामले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. समाजवादी पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पक्षाचे जिल्हाध्यक्ष इलियास पठाण आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोनात सहभागी झाले होते.




