
मोठी आईच्या गावाला गेलेला चेतन परतलाच नाही
आमगाव,दि.23: –दहा लाखाच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोदा येथील शेतात आज बुधवारला दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चेतन नरेश खोब्रागडे (१७) रा. बनगाव ता आमगाव असे मृत मुलाचे नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चेतन खोब्रागडे हा आपल्या मोठी आईच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी येथे निघाला. परंतु रात्री घरी न परतल्याने घरच्यांनी त्याची शोधाशोध करुन विचारपूस केली. मुलगा घरी न परतल्यामुळे वडीलाने रात्री पोलीस ठाणे आमगाव येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली. रात्रीला चेतनचा अपहरण केले असून त्यासाठी १० लाख रूपयाची खंडणी द्या अशा मागणीचा फोन आला.त्यानंतर खंडणीसाठी जो फोन आला तो फोन क्रमांक कुणाचा हे तपासल्यावर तो मध्यप्रदेशातील दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (वय २४ रा. नवेगाव खैरलांजी)याच्या असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. बोदा येथील शेतात असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात मृतदेह ठेवला होता. त्याची चप्पल तणसाच्या ढिगाऱ्याच्या बाहेर मिळाली. त्या चप्पलांजवळ जाऊन श्वान थांबला. पोलिसांनी तणसाच्या ढिगार्यात शोध घेतला असता चेतनचा मृतदेह आढळला. चेतन हा आयटीआय मध्ये शिकत होता. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.





