
चंद्रपूर- मोठमोठय़ा उद्योगपतींकडून बँकांना अब्जावधींचा गंडा घालून कर्जाची परतफेड न करता परदेशात पळून जाण्याची प्रकरणे उजेडात आली असून, या घोटाळेबाज लोकांना अटक करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले असतानाच चंद्रपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भारतीय स्टेट बँकेला बनावट प्राप्तिकर परताव्याचे विवरणपत्र सादर करून तब्बल १४ कोटी २७ लाख ६१ हजार ७00 रुपयांनी गंडा घालणार्यांपैकी तब्बल ११ कर्जधारक, एक एजंट व बँकेच्या तीन अधिकार्यांना मंगळवार, १ मार्च २0२२ रोजी अटक करण्यात आली असून, सात आरोपी फरार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी ४ जानेवारी २0२0 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र व ई-मेलद्वारे सदर घोटाळ्याची तक्रार दिली होती व यासंदर्भात चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन घोटाळा उघड केला होता. राजीव कक्कड यांच्या तक्रारीवरून भारतीय स्टेट बँकेने पोलिस तक्रार दाखल केली. तसेच अंतर्गत चौकशी केली असता तक्रारीत तथ्य आढळून आले. त्या अनुषंगाने भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग भ. भागवतकर यांनी रामनगर पोलिस स्टेशनला दि. ८ मार्च २0२0 रोजी लेखी तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीवरून पोलिस स्टेशन रामनगर येथे अप क. २६७ / २0२0 कलम ४२0, ४0६, ४0९, ४१७, ४२0, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१,१२0 (ब)भादंवि अन्वये गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील स्टेट बँक ऑफ इंडियाकडे ४४ कर्ज प्रकरणात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत गृहकर्जासाठी अर्ज केले. सदर प्रकरणी कर्ज प्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मूल्यांकनापेक्षा जास्तीच्या रकमेचे गृहकर्जामध्ये वाटप झाले असल्याचे सिद्ध झाले. सदर कर्जवाटप प्रक्रियेत एकूण १४ कोटी २६ लाख ६१ हजार ७00 रुपयांनी बँकेची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलिस स्टेशनला तकार दाखल केली होती, त्यानुसार प्रकरणी गुन्हा नोंद झालेला आहे. सदर गुन्ह्य़ाचा तपासात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून बँकेस सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात एकूण ११ कर्जधारक, एक एजंट व बँकेच्या तीन अधिकार्यांना अटक करण्यात आलेली आहे.
अटक करण्यात आलेल्या घोटाळेबाज लोकांत १. श्वेता महेश रामटेके (वय ४२), धंदा मजुरी रा. पंचशील चौक वॉर्ड क्र. १ बाबुपेठ चंद्रपूर, २. वंदना विजयकुमार बोरकर (वय ४0) धंदा मजुरी रा.नगिनाबाग चोर खिडकीजवळ चंद्रपूर, ३. योजना शरद तिरणकर (वय ४२)धंदा व्यापार रा. डिसके ग्रिन डुप्लेक्स नं. २५ म्हाडा कालनी दाताळा चंद्रपूर, ४. शालिनी मनीष रामटेके (वय ४५) रा. धंदा व्यापार रा भंगाराम वॉर्ड भद्रावती, ५. मनीष बलदेव रामटेके (वय ४७) धंदा व्यापार रा. भंगाराम वॉर्ड भद्रावती, ६. मनीषा विशाल बोरकर धंदा कॅटरिंग रा. आंबेडकर वॉर्ड भद्रावती, ७. वृंदा कवडु आत्राम (वय ४९)धंदा दुकान रा. डिसके कॉलनी बोर्डा वरोरा ता. वरोरा, ८. राहुल विनय रॉय (वय ३६)धंदा दुकान रा. हॉटेमट कॉलनी माजरी, ९. गजानन दिवाकर बंडावार (वय ३९)रा. धाबा, १0. राकेशकुमार रामकरण सिंग (वय ४२)रा. सास्ती राजुरा, ११. गणेश देवराव नैताम (वय ३६) रा. पोंभुर्णा ह.मु. कोसारा, १२. गिता गंगादिन जागेट (वय ५३) रा. घुग्घुस, १३. पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी (वय ३९)रा. ह.मु. प्लॉट निर्माणनगर तुकूम चंद्रपूर मूळ पत्ता प्लॉट नं. ९१ बंडू सोनी लेआउट परसोडी नागपूर, १४ विनोद केशवराव लाटेलवार (वय ३८)रा. ह. मु. हनुमाननगर तुकूम चंद्रपूर मूळ पत्ता वॉर्ड क्र. ४ सावली ता. सावली जि. चंद्रपूर, १५. देवीदास श्रीनिवासराव कुळकणी (वय ५७) रा. मुकूंदनगर अकोला, मूळ पत्ता बादुले बुद्रुक, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर यांचा समवेश असून या प्रकरणात भद्रावतील राजकीय नेते तथा प्रतिष्ठित महिला सुध्दा गुंतल्या असल्याची चर्चा असून पोलिस लवकरच त्यांनासुद्धा गजाआड करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी कळविले आहे. सदर प्रकरण पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक मस्के (आर्थिक गुन्हे शाखा) अधिक तपास करीत आहेत





