मोर्शी,दि.04ः-तालुक्यातील रिद्धपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले. त्यामुळे रिद्धपुरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस छावणीचे स्वरूप आले. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील रिद्धपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांनी गुरुवारी रात्रीच्या दरम्यान माती फासल्याची बाब शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात येतच एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना कळताच पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. याच दरम्यान काही
गावकऱ्यांनी मोर्शी ते चांदूर बाजार रोडवर असलेल्या बस स्थानकावर एकत्र येऊन टायर जाळून घटनेचा निषेध केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मोर्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे, उपविभागीय अधिकारी नितीकुमार हिगोले,तहसीलदार सागर धावडे,शिरखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कडूकर व अन्य कर्मचाऱ्यांनी रिद्धपूर गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे पाणी व दुधाने स्नान करून उपविभागीय अधिकारी नितींकुमार हिगोले यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. रिद्धपूर येथील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.सीसीटीव्ही लावण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी सीसीटीव्ही लावण्यात यावी अशी मागणीसुद्धा यावेळी ग्रामस्थांनी केली.
लवकरच अटक करणार
येत्या चोवीस तासाच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकास अटक करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याने तणाव निवळला.





