
रेवा: आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
मुंबई, दि. ०७ मार्च: महिला विकास कक्ष, मुंबई विद्यापीठ, मणी बेन नानावटी वूमेन्स कॉलेज आणि देवी प्रसाद गोएंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ व ९ मार्च २०२२ दरम्यान दोन दिवसीय आभासी आंतरराष्ट्रीय परिषद “रेवा”(Representation and Expression of Women in Art)चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, श्रीमती हिमाद्री नानावटी, योगिनी सेठ, अशोकजी सराफ, आणि नरेंद्रजी गोएनका यांची उपस्थिती लाभली आहे. या परिषदेचे बीज भाषण डॉ. स्वरूप संपत रावळ या करतील.
रेवा या परिषदेत वैश्विक स्तरावरील कलेच्या विभिन्न क्षेत्रातील जगप्रसिद्ध स्त्रीकलावंत व साहित्यिक आपली कला प्रदर्शित करतील व सामूहिक चर्चेत सहभागी होतील. ज्यात संगीत, नृत्य, रंगमंच अर्थात थियेटर, साहित्य व सिनेमा इत्यादी माध्यमात स्त्रियांचा सहभाग आणि योगदान या संदर्भात सखोल विचारविमर्श केला जाईल. दुसऱ्या सत्रात संगीत विषयक असेल या सत्राचे नियंत्रक म्हणून सूत्र श्रीमती नंदिनी त्रिवेदी या सांभाळतील. तर या सत्रात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलावंत डॉ. पंडिता धनश्री राय आणि पंडिता अनुराधा पाल यांची उपस्थिती राहणार आहे. तृतीय सत्र रंगमंचीय कलेबाबत असेल ज्यात पद्मावती राव, लुबाना सलीम, दीपा गहलोत आणि पुष्कर श्रोत्री आदी या सत्रात सहभागी असतील. तर जनक टोपरानी हे सत्राचे नियंत्रक म्हणून भूमिका पार पाडतील.
या आंतरराष्ट्रीय संमेलनाचा दुसरा दिवस चतुर्थ सत्राने सुरू होईल. या सत्राचे अध्यक्षपद सांची युनिव्हर्सिटी ऑफ बुद्धीस्ट अँड इंडिक स्टडीज या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नीरजा अरुण गुप्ता या भूषवतील. भारतीय साहित्यात स्त्री या विषयावरील त्यांच्या बीज भाषणाने या सत्राची सुरुवात होईल. तसेच विक्रम युनिव्हर्सिटी वाराणसीच्या मानव्यविद्या शाखेचे डीन तसेच हिन्दी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र शर्मा हे या सत्राचे नियंत्रक म्हणून काम पाहतील. तर डॉ. सुर्यबाला, डॉ. माधुरी छेडा, डॉ. शामल गरुड व डॉ. पिनाकिनी पंड्या यांचा मोलाचा सहभाग राहिल. या सत्रात साहित्यावर सांगोपांग चर्चा घडून येईल. याच सत्रात डॉ. गीलियान डूली (आस्ट्रेलिया) या इंग्रजी साहित्यातील प्रशिष्ट कादंबरी “जेन ऑस्टिन”मधील संगिततत्चाचे अनुबंध समीक्षात्मक पद्धतीने साक्षात करतील.
पाचवे सत्र सिनेमाच्या संदर्भात राहील. यात अनु सिंग चौधरी नियंत्रक म्हणून काम पाहतील तर रेणुका शहाणे, मोनिका अडवाणी, आणि विभा सिंग या चर्चेत सहभागी असतील. या सत्राचे मूख्य आकर्षण सिने नाट्यकार सौम्य जोशी यांचे प्रस्तुतीकरण राहील. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा “हेल्लारो” च्या विविध पैलू आणि निर्मिती प्रक्रिया आपल्या वक्तव्यातून साक्षात करतील. ते या सिनेमातील काही वेचक दृष्य ही त्यांच्या वक्तव्या दरम्यान सादर करतील.