“ माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावा आहे, मी जर खोटं बोलत असेल तर मला इथेच फाशी द्या” ; रवी राणा यांचं सभागृहात विधान

0
67

अमरावती– शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस व मनपा प्रशासनाकडून काढून टाकण्यात आल्याने, अमरावतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवाय, मनपा आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार देखील घडला होता. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या सर्व प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच, गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास व मला अटक करण्यास सांगितलं असल्याचाही त्यांनी आरोप केला. याचबरोबर, “ माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये याबाबतचा पुरावा आहे, मी जर खोटं बोलत असेल तर मला इथेच फाशी द्या.” असं आमदार राणा यांनी सभागृहात बोलून दाखवलं.

…परंतु त्या दिवशी मी दिल्लीला होतो –

आमदरा रवी राणा यांनी सांगितलं की, “राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त अनेक शिवभक्तांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. १२ मार्च रोजी पुतळा बसवल्यानंतर त्या ठिकाणी दुग्ध अभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. मोठ्याप्रमाणावर आराधना झाली. दिवाळी सारखं वातावरण अमरावती शहरात होतं. कुणाची तक्रार नव्हती आणि पाच दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या उड्डाणपूलावरून छन्नी, हातोड्याने मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या संगनमताने काढला जातो. अतिक्रमण विभागाचं जे गोदाम आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. आमच्या दैवतााल जर छन्नी, हातोड्याने काढून जर त्या गोदामात टाकत असतील तर साहाजिकच शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. शिवभक्तांच्या भावना दुखावल्यानंतर त्या ठिकाणी ९ फेब्रुवारीला काही शिवभक्तांनी मनपा आयुक्तांवर शाई फेकली त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचा आम्ही निषेधच करणार आहोत. परंतु त्या दिवशी मी दिल्लीला होतो रेल्वे विभागाच्या एका बैठकीत मी उपस्थित असताना, मला फोन येतो की अमरावती मध्ये तुमच्यावर ३०७ आणि ३५३ असा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावेळी मी दिल्लीत होतो.”

पोलिसांनी रात्री ३ वाजता घरात घुसून माझ्या घरच्यांची चौकशी केली –

तसेच, “त्यानंतर मी जेव्हा याबाबत माहिती घेतली, तर पोलीस आयुक्त आरती सिंग मला सांगतात की सरकारमधल्या काही प्रमुख लोकांनी मला हा गुन्हा दाखल करायला लावला आणि रवी राणाला अटक करा असं सांगितलं. त्यानंतर माझ्या घरी १०० ते १५० पोलीस जातात, माझ्या घरी वृद्ध आई-वडील आहेत, माझ्या आईचं गुडघ्याचं ऑपरेशन झालंय, पोलिसांकडून रात्री ३ वाजता घरात घुसून त्यांची चौकशी केली जाते आणि माझ्या घराची तपासणी केली जाते. खासदार नवनीत राणा यांना देखील ताब्यात घेतलं जातं, त्यांचा देखील अपमान केला.” असंही रवी राणा यांनी बोलून दाखवलं.

मला आज आर आर पाटील यांचे आठवण येते –

याचबरोबर, “मी या ठिकाणी सांगतो या राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी पोलीस आयुक्तांना मला अटक करण्यासाठी फोन केला आणि माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये त्याचा पुरावा आहे. मला आज आर आर पाटील यांचे आठवण येते, कारण त्यांच्या सारखे गृहमंत्री या राज्याला पाहिजे. या राज्यात जर तुम्ही वाझे सारखे गुन्हेगार अधिकारी निर्माण कराल तर तुमची देखील अनिल देशमुख यांच्यासारखी परिस्थिती होईल, हे विसरू नका. या केवळ माझ्या भावना नाहीत, तर संपूर्ण सभागृहाच्या भावना आहेत. माझ्या सारख्या आमदारावर जर ३०७ , ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल होत असेल आणि त्यासाठी तुम्ही फोन करताय हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. आज या सभागृहात मी सांगू इच्छितो की, ज्या आरती सिंग या पोलीस आयुक्त आहेत, मनपा आयुक्त आहेत ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला. दीड वाजता ही घटना झाली आणि माझ्यावर रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल केला जातोय. मला सांगितलं जातं की एवढा दबाव आहे की, रवी राणा जर दिसला तर गोळी मारून टाका. माझ्यासारख्या आमदरावर जर अशा प्रकारची जर परिस्थिती असेल, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी जर खोटं बोलत असेल तर मला इथेच फाशी द्या, हे जर खोटं असेल तर मी इथेच फाशी घेईन, मला फाशी द्या.” अशा शब्दांमध्ये रवी राणा यांनी आपलं म्हणणं मांडत संताप व्यक्त केला.