गोंदिया,दि.08ः- गोंदिया जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातर्फे कर्मचारी महासंघ सभागृहात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड होत्या. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य व पाणी व स्वच्छता मिशन) नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत) राजकुमार पुराम,मुख्य लेखा वित्त अधिकारी अमृता परदेशी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण संजय गणवीर व जिल्हा परिषदेतील इतर विभाग मंचावर उपस्थित होते. 
जागतिक महिला दिन कार्यक्रमानिमित्त बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी महिला दिनाचे महत्व पटवून देत आज महिलांनी गावखेड्यापासून राष्ट्रपतीपर्यंतंची सर्व महत्वाची पदे भुषवली आहेत.सोबतच प्रशासकीय यंत्रणेतही महत्वाच्या पदावर बसून विकासाच्या श्रृखंलेत सहभागी झाल्याचे विचार व्यक्त केले.महिलांनी स्वकर्तृत्वान होत आपल्यातील क्षमतेने यशाची शिखरे गाठण्याची जिद्द मनात बाळगावी तसेच आपापली कामे प्रामाणिकपणे पार पाडावी असे विचार व्यक्त करीत जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्य.अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर यांनी तर कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षिका उषा आगाशे यानी केले. कार्यक्रमाचे आभार विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यानी मानले. आजच्या दिनाचे औचित्य साधून आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तदनंतर कौटुंबिक हिंसाचार कायदा याबाबत संरक्षण अधिकारी श्री.महा यांनी व कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळ (प्रतिबंध निवारण व मनाई) याबाबत श्री.गौतम,विधी सल्लागार यांनी मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व महिला कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महिला व बालविकास विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




