
पवनी,दि.11ः- मधमाशांनी केलेल्या अनपेक्षित हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गोसीखुर्द धरणाच्या कालव्यात उडी मारणाऱ्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पवनी येथे घडली. विशेष म्हणजे हा तरुण पवनी येथे आपल्या नातलगाकडे पाहुणा म्हणून आला होता.पवनी येथील शनिवारी वार्डात राहणाऱ्या भूषण वैद्य यांच्या घरी पाहुणा म्हणून आलेला त्यांचा वर्धा जिल्ह्यातील महेश रेवतकर नावाचा साळा आज 11 रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालवा परिसरात फिरायला गेला होता.फिरत असताना अचानक मधमाशांनी त्याच्यावर हल्ला केला. मोठ्या प्रमाणावर मधमाशांचा हल्ला झाल्याने आपला जीव वाचविण्यासाठी पळू लागलेल्या महेशने बाजूलाच असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात उडी घेतल्याचे सांगितले जाते.पाण्यात मधमाशा चावत नाही असा असा समज झाल्याने कालव्यातून उडी घेणाऱ्या महेशचा मात्र पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह कालव्यात काही अंतरावर पोलिसांना गवसला. काही लोकांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. मात्र मधमाशा पासून प्राण वाचविण्यासाठी उडी घेणाऱ्या महेशचा पाण्यात
बुडून जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.





