नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक

0
55

गडचिरोली,दि.१ मार्च-गुड्डीगुडम येथील व्ही एम मतेरे इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे ऑफीसमध्ये जाऊन २५ लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी १२ मार्च रोजी अटक केली असून त्यांचे कडून बंदूक व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. मल्लेश मारय्या आऊलवार (२४) रा. राजाराम (खां.) ता. अहेरी व श्रीकांत सोमा सिडाम (२०) रा. चेरपल्ली ता. अहेरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपीना १७ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

मौजा गुड्डीगुडम येथील व्ही एम मतेरे इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे ऑफीसमध्ये जाऊन २५ लाख रु. खंडणी जिमेला नाल्याजवळील पुलावर आणुन देण्याबाबतची मागणी हिरवे ड्रेस घातलेले ३ ते ४ बंदुकधारी इसमांनी केली होती. मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार गडचिरोली पोलीस दलाच्या १२ मार्च रोजी जिमेला नाल्याचे पुलाजवळ सापळा रचला. दरम्यान आरोपी नामे मल्लेश मारय्या आऊलवार वय २४ वर्ष रा. राजाराम (खां.) ता. अहेरी जि. गडचिरोली, श्रीकांत सोमा सिडाम वय २० वर्ष रा. चेरपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली हे जिमेला नाल्याच्या पुलाजवळ थांबुन होते. पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी साध्या वेषात पुलाजवळ गेले असता तुम्ही कोण आहात ? असे आरोपीनी विचारले, त्यावर अंमलदारांनी आम्ही रोडचे कामावरील मॅनेजर आहोत असे सांगताच हिरवे गणवेशधारी इसमांनी ठरविल्याप्रमाणे पंचेवीस लाख रु. खंडणीची मागणी केली. यावरुन गोपनिय पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेतले व पोस्टे अहेरी येथे आरोपीविरुध्द भादंवि कलम ३८७ व कलम ३४ अन्वये गुन्हा नोंद केला असुन सदर दोन्ही आरोपीना १७ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. यातील इतर आरोपी फरार आहेत.

दुसऱ्या एका घटनेत असरअल्ली पोलिसांनी रंगधाम पेठा चेक शेतशिवारातील घरात खेळल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात आरोपींना ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार झाले आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून २४ लाख १९ हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा ते असरअल्ली रोड दरम्यान मौजा रंगधाम पेठा चेक गावाजवळील एमएसईबी कार्यालयाच्या पाठीमागील शेतशिवारातील घरात अवैधरित्या जुगार अड्डा खेळला जातो अशा मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. अनुज तारे यांचे नेतृत्वाखाली सपोनि जाधव, सपोनि बोंडसे यांनी १२ मार्च रोजी घटनास्थळाचा शोध घेवुन आरोपीवर कारवाई करुन जुगार अड्डा उध्वस्त केला. यात घटनास्थळावरुन ८४००० रू. रोख, ३ चारचाकी, १ दुचाकी, ५ मोबाईल व इतर साहित्यासह एकुण २४१९७२० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपी राजु सैलु तराला वय ३० वर्ष रा. कलेक्टर ऑफिसजवळ, सुभेदार वार्ड पोस्ट जिल्हा हनमा कोंडा राज्य तेलंगाना, सुरेश कुमार पेदन्ना श्रीराम वय ५२ वर्ष रा. वेनुराव कॉलनी करीमनगर राज्य तेलंगाना मल्लेश ओदेलु मेकला वय ४५ वर्ष रा. कॉलर माक्र्स कॉलनी, पोस्ट भोपालपल्ली जिल्हा जयशंकर राज्य तेलंगाना, रामचंदर बथुकैया वेमुला वय ५२ वर्ष रा. गारेपल्ली जि. जयशंकर भुपालपल्ली राज्य तेलंगाना, धनंजय समय्या अकुबाडी वय २४ वर्ष रा. दुब्बागुडम ता. सिरोंचा जि. गडचिरोली, रामक्रिष्णा समय्या सोदारी वय २० वर्ष रा. सिरोंचा जि. गडचिरोली अशा सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तीन आरोपी क्रिष्णाय वेमुला अंदाजे वय ३० वर्ष रा. गोदावरी खणी जि. पेदापल्ली राज्य तेलंगाना, थालारी रवीसागर अंदाजे वय २५ वर्ष रा. जानमपल्ली ता. सिरोंचा जि. गडचिरोली हे फरार आहेत. सदर आरोपीवर पोस्टे असरअल्ली येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.