
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील इटखेडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या अपक्ष जि.प. सदस्या पौर्णिमा उमाकांत ढेंगे यांनी २८ मार्चला भारतीय जनता पार्टी तालुका अर्जुनी मोरगावच्यावतीने आयोजित माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा वाढदिवस, “शिवराय ते भीमराय” या संगीतमय समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत येणा-या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती तथा नगरपंचायत सदस्यांचा सत्कारप्रसंगी आवर्जून उपस्थिती दर्शवित या दाम्पंत्याने भाजपतर्फे सत्कार (Pournima Dhenge felicitated) स्वीकारला. त्यामुळे तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यातील भाजपा नेते, कार्यकर्ते व अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकंदरीत गोंदिया जिल्हा परिषदमध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा मार्ग तर मोकळा झाला नाही ना? या चर्चांना जिल्हाभर उधाण आले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदच्या निवडणुका होवून जवळपास दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र अजुनपावेतो जि.प.मध्ये सत्ता स्थापनेचा मुहूर्त निघायला आहे. निवडणूक काळात मतदारांना विविध प्रकारचे विकासाचे आश्वासन देवून निवडून आलेले जि.प. सदस्य हातावर हात धरून सत्ता स्थापनेच्या मुहूर्ताची वाट पाहत गुपचुप बसले आहेत. एकीकडे सत्ता स्थापनेच्या भानगडी असल्या तरी नेमकी सत्ता कुणाची स्थापन होणार, हा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
सत्ता स्थापनेसाठी 27 सदस्यांची आवश्यकता आहे. गोंदिया जिल्हा परिषदमध्ये भाजपा २६ जागा जिंकुन सर्वात मोठा पक्ष म्हणून जरी समोर आला असला तरी त्यांना बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता आहे. भाजपामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच प्रकारची खलबते सुरू असताना माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपाने आयोजित केलेल्या अर्जुनी-मोरगाव येथील एका कार्यक्रमात अपक्ष जिप सदस्य पौर्णिमा उमाकांत ढेंगे यांचा सत्कार भाजपाच्या दृष्टीने सत्ता स्थापन करण्यासाठी फायदेमंद तर ठरणार नाही ना? या चर्चांना आता जिल्हाभर उधाण आले आहे.
भाजपने नाकारली होती उमेदवारी
जि.प. सदस्य पौर्णिमा ढेंगे यांचे पती उमाकांत ढेंगे हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भाजपाचे मोठे नेते आहेत. यापूर्वी ते गोंदिया जिल्हा परिषदमध्ये भाजपाचे जि.प. सदस्य म्हणून कृषी व पशुसंवर्धन सभापती होते. ते काही वर्षे अर्जुनी मोरगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष सुध्दा होते. सध्या भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुध्दा होते. तसेच माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे उजवे हात म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख आहे.