32.1 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home महाराष्ट्र मुंबई विद्यापीठात सिने टॉकीजच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

मुंबई विद्यापीठात सिने टॉकीजच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन

0
20

blank

मुंबई, दि. १९ मे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्कार भारती, मुंबई विद्यापीठाच्या एकेडमी ऑफ थिएटर आर्ट आणि इंदिरा गांधी नेशनल सेंटर फॉर आर्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने सिने टॉकीज- “सिने सृष्टी – भारतीय दृष्टी” या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन मुंबई विद्यापीठात १३ ते १४ मे २०२२ दरम्यान करण्यात आले. कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्याला अध्यक्षस्थानी केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्री अर्जुन राम मेघवाल, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, प्रख्यात चित्रपट निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, इंदिरा गांधी नेशनल सेंटर फॉर आर्टचे डॉ. सच्चिदानंद जोशी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, सुप्रसिद्ध चित्रकार आणि संस्कार भारतीचे अध्यक्ष श्री वासुदेव कामत यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री श्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी निगडित असे अनेक नायक आहेत, ज्यांच्या कथा सिनेमातून सांगितल्या गेल्या पाहिजे. त्यांनी राजस्थानमधील खेताडी राज्यातील राजाच्या दरबारातील गायिका मैनाबाईचे उदाहरण दिले, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना मानवाविषयीच्या त्यांच्या समजाबद्दल प्रश्न विचारून आव्हान दिले. या घटनेने स्वामी विवेकानंदांना आतून बदलून टाकले. त्यामुळे मैनाबाईंची कथा जगाला सांगणारा सिनेमा असावा, असे मेघवाल म्हणाले. तसेच अनेक ‘अनसंग हिरोज्’ असलेले नायक अनेक चित्रपटांसाठी साहित्य आहेत आणि भारतीय चित्रपट उद्योगाने त्यांच्यावर चित्रपट बनवले पाहिजेत, असेही मेघवाल यांनी भारतीय चित्रपट उद्योगाकडून अपेक्षा व्यक्त केल्या.

परिसंवादाच्या उद्घाटनावेळी आपले प्रमुख भाषण देताना, प्रख्यात चित्रपट निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात त्यांना सापडलेल्या चित्रपटाची मुळे स्पष्ट केली. ते म्हणाले की, ब्रह्मदेवाने केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर विविध रसांच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना इतिहासाचा संदेश देण्यासाठी ब्रह्मदेवाने नाटकाचा शोध लावला होता.

याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख म्हणाल्या की, चित्रपट उद्योगाचा सामान्य लोकांवर मोठा प्रभाव आहे. सर्वसामान्यांचे मेंदू सिनेमाने पूर्णपणे पकडले आहेत. सुरुवातीच्या काळात सिनेमा उद्योग फक्त मनोरंजनासाठी ओळखला जात होता, जो हळूहळू आता एक विचारप्रवर्तक कला म्हणून विकसित झाला आहे. सिनेमाद्वारे अनेक सामाजिक समस्या मांडल्या गेल्या आणि त्यावर उपायही दिले गेलेत. जगातील सर्वात मोठ्या सिनेमा उद्योगाचा भाग असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

इंदिरा गांधी नेशनल सेंटर फॉर आर्टचे सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी म्हणाले की, सिनेमा हे संस्काराचे माध्यम आहे. दृकश्राव्य माध्यम हे सर्वात प्रभावशाली असून त्याचा वापर हुशारीने केला पाहिजे. सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता त्याचा उपयोग समाजाला सत्य सांगण्यासाठी व्हायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी, मुंबई विद्यापीठाने चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू केले असून भारतीय चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी विद्यापीठ योगदान देऊ इच्छित असल्याचे त्यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. सुप्रसिद्ध चित्रकार आणि संस्कार भारतीचे अध्यक्ष श्री वासुदेव कामत यांनी सर्वांचे स्वागत केले तर सिने टॉकीजचे संयोजक श्री अरुण शेखर यांनी “सिने सृष्टी भारतीय दृष्टी” या परिसंवादामागील संकल्पना स्पष्ट केली.

दोन्ही दिवसाच्या चर्चासत्रामधून स्वातंत्र्यलढ्यातील भारतीय सिनेमाच्या योगदानावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. गायक-गीतकार आणि संगीत निर्माते अनु मलिक, दुर्गा जसराज, भरत बाला, रविराज प्रमाणी, वसंत साई, अक्षय कुमार पारिजा, विष्णू शर्मा, कौशल इनामदार, ओम राऊत, अभिषेक जैन, टी. एस. नागभरणा या मान्यवरांनी भारतीय चित्रपटांच्या योगदानावर चर्चा केली. यामध्ये भारतीय सिनेमा संगीत – द बुस्टर डोज ऑफ ऑफ फ्रिडम स्ट्रगल, सिनेमा एज अ सॉफ्ट पॉवर – द रोडमॅप अशा वैविध्यपूर्ण विषयांवर विचार मांडण्यात आले.

समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, प्रसिद्ध लेखक आणि सीबीएफसीचे अध्यक्ष पद्मश्री प्रसुन जोशी, प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक श्री जे. नंदकुमार, संस्कार भारतीचे उपाध्यक्ष श्री नितीश भारद्वाज, प्रसिद्ध दिग्दर्शक शोमॅन सुभाष घई, मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अजय भामरे, संस्कार भारतीचे महामंत्री श्री अश्विन दळवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाला संबोधित करताना जे. नंदकुमार म्हणाले की, लोकांची मानसिकता बदलण्यासाठी कला आणि संस्कृतीची मोठी जबाबदारी आहे. सिनेमाने स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिल्याचे म्हणन्यापेक्षा सिनेमा हाच स्वातंत्र्य लढा होता असे त्यांनी सांगितले.

पद्मश्री पुरस्कार विजेते, प्रख्यात लेखक आणि सीबीएफसीचे चेअरमन श्री प्रसून जोशी म्हणाले की, चित्रपट कोण बनवत आहे आणि ते कोणत्या पार्श्वभूमीचे आणि संवादाचे आहेत हे खूप महत्वाचे आहे. चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी खूप धाडस लागते. प्रतिभा असलेल्या माणसाला चित्रपट बनवायचा असतो, इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तीने नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी संस्कार भारतीचे उपाध्यक्ष श्री नितीश भारद्वाज यांनी चित्रपट हे नेहमीच प्रभावीपणे संदेश देण्यासाठी प्रभावी माध्यम राहिले असल्याचे सांगितले. संस्कार भारतीचे महामंत्री श्री अश्विन दळवी यांनी या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाबाबत ज्यांचे सहकार्य लाभले अशा सर्वांचे आभार मानले.

सिने टॉकीज- “सिने सृष्टी – भारतीय दृष्टी” या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये देशभरातील विविध विद्यार्थी, संशोधक, समीक्षक, सिनेक्षेत्राशी निगडीत मान्यवरांनी हजेरी लावली होती.

blank