
गोंदिया,दि.27 : शैक्षणिक सत्र 2021-2022 मध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात एकूण 29266 विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यापैकी 24164 अर्ज मंजूर करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे 498, इतर मागासवर्ग प्रवर्गाचे 1034, विशेष मागास प्रवर्गाचे 95 व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाचे 209 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत आहेत.
महाविद्यालय स्तरावरील प्रलंबीत अर्जामध्ये काही महाविद्यालयांनी (नर्सिंग, बि फॉर्म) आपल्या महाविद्यालयांची फी अजुनपर्यंत संबंधीत विभागाकडून मंजूर केलेली नाही. तसेच होमिओपॅथिक, आयुर्वेदिक या महाविद्यालयांचा निकाल जाहिर करण्यात आलेला नाही, तर काही महाविद्यालयांचे आयडीवर विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये असून त्रुटींची पुर्तता विद्यार्थी तसेच संबंधीत महाविद्यालयाने केलेली नाही. फी मंजूर करुन घेणे, परीक्षेचा निकाल लावण्यासाठी पाठपुरावा करणे, विद्यार्थ्यांच्या त्रुटीतील अर्जावर कार्यवाही करुन, विद्यार्थ्यांना संपर्क करुन त्रुटीची पुर्तता करणे ही कामे महाविद्यालयांची आहेत, तसे होतांना दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील, याची नोंद महाविद्यालयांनी घ्यावी.
तरी महाविद्यालयांनी संबंधीत विद्यापीठाशी/संबंधीत विभागाशी संपर्क करावा व फी मंजूर करुन घ्यावी तसेच निकाल जाहीर करण्याकरीता आपल्या संबंधीत परीक्षा नियंत्रक विभागाशी संपर्क साधावा. विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाने अर्जातील त्रुटींची पुर्तता करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांचे आयडीवर सादर करण्याचे आवाहन डॉ.मंगेश वानखडे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी केले आहे.