बियाणे कंपन्यांकडून मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांना कमीशन;आमदार राणांचा सनसनाटी आरोप

0
15

अमरावती, दि.३१ (प्रतिनिधी) : बियाणे कंपन्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषीमंत्री दादाजी भुसे यांना कमीशन दिल्या जात असल्याचा सनसनाटी आरोप अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील कंपन्यांकडून राज्यात बियाणे येत असून याच कंपन्यांना संबंधितांना कमीशन देत असल्याचे ते म्हणाले. _ गत वर्षी दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या राणा दांपत्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी असल्यामुळे राणा दाम्पत्य जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले होते. यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधतांना आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठविली.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होती. शेतकऱ्यांसाठी आम्ही आंदोलन केले होते. परंतु आपणासह शेकडो कार्यकर्त्यांना कारागृहात टाकण्यात आले होते. सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या सर्व पिकांवर लाल्या रोग आला होता. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. शेतात सडलेली पिके घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलो होतो. त्यावेळीसुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही केलेल्या एकूण सात ते आठ आंदोलनादरम्यान दाखल प्रकरणाच्या संदर्भात न्यायालयात सुनावणी होती. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही लढा देतच राहू. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यामुळे आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले. मात्र, आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल, असे देखील आमदार रवी राणा म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक आहोत. त्यांच्यासाठी आंदोलन केल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कुठल्याही शिक्षेला घाबरत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही सदैव प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.