ग्राहक जनसंपर्क अभियान
गोंदिया, दि.10: केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी बँकेमार्फत कर्ज दिल्या जाते. या कर्जाचा लाभार्थ्यांना कमी व्याज दराने पुरवठा केला जातो. कर्ज घेतेवेळी आपण आपल्या व्यवसायाचे नियोजन करणे आवश्यक आहे. बँक कर्ज योजनांचा लाभ घेऊन त्याची वेळेत परतफेड अत्यंत गरजेची आहे. लाभार्थ्यांनी ही लक्षात घेऊनच नियोजन करावे व कर्जाची परतफेड वेळेत करावी आणि आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
अग्रणी जिल्हा बँक, बँक ऑफ इंडियाद्वारे आयोजित ग्राहक जनसंपर्क अभियान मेळाव्यात ते बोलत होते.
बँकांनी जास्तीत जास्त व्यक्तींना बँकिंग व विविध शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्याकरिता बँक ऑफ इंडिया, अग्रणी जिल्हा बँक द्वारे ग्राहक जनसंपर्क अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उप महाप्रबंधक-रिजर्व बँक ऑफ इंडिया नागपूर श्रीमती रेहमत पारक्कर, उप-आंचालिक प्रबंधक-बँक ऑफ इंडिया-नागपूर अंचल श्री. गवलीकर, सहाय्यक महाप्रबंधक- रिजर्व बँक ऑफ इंडिया -नागपूर हनुमा कुमारी, अग्रणी जिल्हा प्रबंधक -बँक ऑफ इंडिया उदय खर्डेनवीस तसेच विविध बँक शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमध्ये उदय खर्डेनवीस यांनी भारत सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या जन समर्थ पोर्टल बद्दल माहिती दिली. ज्यांच्या माध्यमातून तेरा शासकीय योजनांचा लाभ एक पोर्टल वरून घेऊ शकतो. या योजनांमध्ये शैक्षणिक कर्ज, कृषी पायाभूत सुविधा कर्ज, उद्योगासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टॅन्ड अप योजना तसेच महिला बचत गटासाठी आजीविका अश्या विविध योजनांचा लाभ एका पोर्टल वरून घेऊ शकतो. त्यासोबतच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) मध्ये सेवा उद्योगांकरिता 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो तसेच उत्पादन उद्योगांकरिता 25लाख रुपया पर्यंत कर्ज घेऊ शकतो. यानंतर श्रीमती रेहमत पारक्कर यांनी रिजर्व बँकेबद्दल माहिती दिली. त्यासोबतच चलनी नोटांच्या ओळखी कश्याप्रकारे करायचे याबद्दल माहिती दिली. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देऊन नोटांच्या छपाई वरील खर्च कमी होईल व त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होऊ शकतो याकरिता त्यांनी यूपीआय 123 बद्दल माहिती दिली. गवलीकर यांनी बँक कर्ज घेणे व त्याची वेळेवर परतफेड करणे महत्वाचे आहे त्यामुळे अधिक व्यक्तीना कर्ज पुरवठा करता येऊ शकतो. आपले कर्ज खाते हे एनपीए होऊ ना देणे ही कर्जदाराची व बँकेची महत्वाची जवाबदारी असते याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँक कर्ज योजनांचा लाभ घेऊन त्याची वेळेत परतफेड करण्याविषयी माहिती दिली. यानंतर कार्यक्रमध्ये जिल्ह्यातील बँकांनी विविध योजना अंतर्गत मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणाची मंजुरी अर्ज वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमध्ये सर्व बँकांनी आपले स्टॉल लावून भेट देणाऱ्या सर्व व्यक्तीना सुवर्ण ऋण, कृषी कर्ज, गृह कर्ज, सुष्म लघु मध्यम उद्योग कर्ज अश्या विविध बँक कर्ज योजनांबद्दल बद्दल माहिती दिली. कार्यक्रमामध्ये शेवटी राहुल गणवीर-निदेशक-आरसेटी गोंदिया यांनी सर्व उपस्थित व्यक्ती व अतिथीचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.