पवारांचे भाजपवर शरसंधान:म्हणाले- मते फुटली नाहीत; विरोधकांच्या अतिरिक्त मतांची कल्पना

0
29

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. मात्र, विरोधकांना मिळालेली अतिरिक्त मते कुठून आली याची कल्पना असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असून त्यांनी रडीचा डाव खेळला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पवार म्हणाले ,राज्यसभा निवडणुकीची जागा भाजप जिंकला हे पाहून धक्का बसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या कोट्यातील कोणतीही मते फुटलेली नाहीत. प्रफुल्ल पटेल यांना एक मत जादा पडले, मात्र ते आघाडीतून पडले नसून दुसऱ्या बाजूने पडलेले आहे. आमच्याकडे पुरेसे बहुमत सातव्या जागेसाठी नव्हते तसेच ते भाजपकडे ही नव्हते. मात्र, अपक्षांची भूमिका यात निर्णयाक होती. अपक्ष प्रामुख्याने भाजपकडे झुकलेले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गाने माणसे आपलीशी करण्याचा डाव यशस्वी करता आला. सरकार चालवताना कोणत्याही प्रकारे बहुमताला धक्का बसलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये योग्य प्रकारे समन्वय होता. निवडणुकीच्या राजकारणात 2-4 मध्ये कमी-जास्त होतात. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या मतात फरक पडलेला नाही. मात्र अपक्ष मतात गमती झाले आहे.

निवडणुकीच्या प्रक्रिया भाजपने हरकती घेतल्या तो रडीचा डाव त्यांनी केला. पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पक्षप्रतोदला मत दाखवायचे त्याप्रमाणे ते दाखवले गेले होते. या संदर्भातील केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला, मात्र त्यास चार तास उशीर झाला त्यामुळे निकाल प्रक्रियेस उशीर झाला. सेनेच्या सहव्या जागेवरील उमेदवाराने मते कोटा नसतानाही चांगल्याप्रकारे मिळवली आहे. दरम्यान नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात संभाव्य उमेदवार कोण असतील यासंदर्भात, अद्याप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली नसून विविध पक्ष एकत्रित बसून त्यासंदर्भात चर्चा करतील असेसुद्धा शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

राऊतांची प्रतिक्रिया:हरभरे टाकल्यावर घोडे कुठेही जातात, ज्यांनी आम्हाला मत दिलं नाही त्यांची नावं आमच्याकडे

राऊत म्हणाले की, कुठे ईडी, कुठे सीबीआय वापरली जाते, आणि कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरली जाते का, अशा प्रकारची शंका आता येऊ लागली आहे. त्यांनी फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला असं नाही. 33 मते पहिल्या पसंतीची मते आम्हाला, तर 27 पहिल्या पसंतीची मते महाडिकांना मिळाली. तसं म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रियेत पहिल्या-दुसऱ्या पसंतीच्या मतांवरून गणित ठरत असते. काही घोडे बाजारात असतात, जास्त बोली लागली किंवा इतर काही कारणे असतील, त्यामुळे 6 मते आम्हाला मिळाली नाहीत. असे लोकं कुणाचेही नसतात. पण महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना असेल, बच्चू कडू असतील, गडाख असतील आमचे एकही मत फुटले नाही.

ज्यांनी आम्हाला मत दिलं नाही, त्यांची नावं आमच्याकडे

आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलो नाही, आम्ही व्यापार केला नाही, तरीही आम्हाला 33 मते मिळाली यातच आमचा विजय आहे. अर्थात ज्यांनी आम्हाला मतं दिली नाहीत, त्यांची आमच्याकडे नावं आहेत, एवढंच मी सांगेन, असा इशाराही राऊतांनी दिला. हितेंद्र ठाकूरांची 3 मते, संजय मामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनी मविआला मते दिली नसल्याचे संजय राऊत यांनी पत्रकारांसमोर सांगितले.