
गोंदिया,दि.11ः-गोंदिया-चंद्रपूर- बल्लारशा रेल्वेमार्गावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंभी ते चारभट्टी बिटातील कक्ष क्रमांक 260 राखीव वनपरिसरातील चारभट्टीजवळील रेल्वेचा विद्युत खांब 10936 व 10937 च्या दरम्यान रेल्वेगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज 11 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अरुणनगर येथील रेल्वेकर्मचारी गोविंदप्रसाद यांना रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रेल्वे व वनविभागाच्या वरिष्ठांना माहिती दिली.माहिती मिळताच उपवनसंरक्षक कुलराजसिंग,नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी डी.व्ही.राऊत,अर्जुनी मोरगाव येथील वनपरिक्षेत्राधिकारी एस.डी.खोब्रागडे,स्टेशन क्षेत्र सहाय्यक डब्लू.एम.वेलतुरे व मानद वन्यजीवरक्षक मुकुंद धुर्वे,रेल्वे सुरक्षाबल उपनिरिक्षक विजय मालेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.तसेच राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक कार्यपध्दतीनुसार पंचनामा करीत कारवाई केली.मृत वाघाच्या नाकातून रक्तस्त्राव झालेला होता,तसेच डावा पाय मोडलेला होता मात्र वाघाचे सर्व अवयव कायम असल्याचे पंचनामावेळी आढळून आले.